दर पंधरा दिवसांनी तुंबतात गटारी !
By Admin | Published: June 26, 2016 09:52 PM2016-06-26T21:52:15+5:302016-06-26T21:53:24+5:30
सिंहस्थनगर : पालिकेचे दुर्लक्ष; अनारोग्याच्या वातावरणाने पसरते रोगराई
सिंहस्थनगर, सिडको : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४४ मधील सिंहस्थनगरात अनेक समस्या असून, गटारींची प्रमुख अडचण आहे. पालिकेच्या भुयारी गटार योजना कुचकामी ठरली आहे. दर पंधरा दिवसांनी या भागातील गटारी तुंबतात आणि रस्त्यावरच वाहतात. पालिकेकडे तक्रारी केल्यानंतर कधी तरी कर्मचारी येतात. मात्र, संपूर्ण समस्या कधी सुटणार, असा प्रश्न नागरिकांनी ‘लोकमत’ टीमपुढे केला.
‘लोकमत तुमच्या दारी’ या उपक्रमांतर्गत सिंहस्थनगरातील नागरिकांनी परिसरातील समस्यांची जंत्रीच मांडली. तथापि, गटारीच्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. महापालिकेच्या गटार योजनेचा नागरिकांना त्रास होतो. गटारींची लेव्हल योग्य नाही तसेच मलवाहिका छोट्या असल्याने या भागात सातत्याने गटारी तुंबतात. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर पालिकेच्या वतीने कंत्राटी कर्मचारी पाठविले जातात. हे कर्मचारी तुंबलेल्या चेंबरचे झाकण काढून स्वच्छता करतात. पंरतु सर्व कचरा आणि घाण याच ठिकाणी टाकून मोकळे होतात.
स्वामी समर्थ केंद्राच्या समोरच चेंबर असून, तेथेच गटार तुंबते. त्यामुळे दुर्गंधी आणि घाणीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पालिकेचे या समस्येकडे दुर्लक्ष परिसरात कचरा आणि पावसाळी पाणी साचण्याची समस्या आहे. महापालिकेकडे तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचे त्यांनी सांगितले.