कसाऱ्यात दरड कोसळल्याने पंधरा तास रेल्वे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:11 AM2021-07-23T04:11:22+5:302021-07-23T04:11:22+5:30

नाशिक रोड : कसारा घाटात बुधवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मुंबई-भुसावळदरम्यानची मध्य रेल्वेची सेवा बुधवारी ...

Fifteen hours train jam due to pain in Kasara | कसाऱ्यात दरड कोसळल्याने पंधरा तास रेल्वे ठप्प

कसाऱ्यात दरड कोसळल्याने पंधरा तास रेल्वे ठप्प

Next

नाशिक रोड : कसारा घाटात बुधवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मुंबई-भुसावळदरम्यानची मध्य रेल्वेची सेवा बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी सायंकाळपर्यंत विस्कळीत झाली होती. त्यातच उंबरमाळी स्थानकात पाणी साचून रेल्वे ट्रॅकखालील खडी वाहून गेल्याने समस्येत भर पडली. या कारणांमुळे मुंबई-भुसावळदरम्यानची रेल्वेसेवा तब्बल पंधरा तास ठप्प होती. कसारा घाटात रेल्वेमार्गावरील कोसळलेली दरड डाऊन मार्गावरील दरड बाजूला करण्याचे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास पूर्ण झाल्याने त्यानंतर हळूहळू रेल्वेसेवा सुरळीत होऊ लागली होती. दरम्यान पंचवटी, राज्यराणीसह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मुंबईहून सुटणाऱ्या व मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मुंबई-ठाणे परिसरात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने बुधवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली. मुंबईला जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेस गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता नाशिक रोडला रद्द करून माघारी पाठविण्यात आली. नाशिक रोडहून रात्री मुंबईच्या दिशेने रात्री अकराला निघालेली सेवाग्राम एक्स्प्रेस इगतपुरीपर्यंतच धावली. गोंदिया-मुंबई गाडी चाळीसगावला, अमरावती-मुंबई मनमाडला तर जबलपूर-मुंबई, हावडा-मुंबई, गोरखपूर-एलटीटी, पटना-मुंबई भुसावळला रद्द करण्यात आली. नागपूर-मुंबई, हावडा-मुंबई, लखनौ-मुंबई नाशिक रोडला तर गोरखपूर, हावडा, पवन एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकात रद्द करण्यात आली.

रद्द करण्यात आलेल्या रेल्वे

कसारा घाटात रेल्वेमार्गावरील कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम गुरुवारी दिवसभर सुरू असल्याने पंचवटी, राज्यराणी, सेवाग्राम एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-जबलपूर, अमरावती-मुंबई, एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-हावडा, मुंबई-शालीमार, गरीब रथ, विदर्भ एक्स्प्रेस, हावडा मेल, तपोवन, काशी, पवन, कामयानी, गोदान, हरिद्वार स्पेशल या गाड्या रद्द झाल्या.

मुंबईला सुटणाऱ्या रेल्वे वसई विरारमार्गे, तर भुसावळवरून मुंबईला जाणाऱ्या रेल्वे जळगाव, मनमाडमार्गे वळविण्यात आल्या. बुधवारी मध्यरात्रीनंतर मुंबईहून सुटणाऱ्या व मुंबईला जाणाऱ्या मुंबई अमृतसर, कृषीनगर, पटना सुपर, पुरी एक्स्प्रेस, हावडा मेल, हावडा मेल इलाहाबाद, भागलपूर एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, महानगरी, पंजाब मेल, छपरा, मंगला एक्स्प्रेस या रेल्वेचे मार्ग बदलण्यात आल्याने प्रवाशांचे खूप हाल झाले.

बुधवारी रात्री दोन वाजेनंतर मुंबईहून येणारी व मुंबईला जाणारी एकही रेल्वे नाशिक रोड रेल्वे स्थानक मार्गे गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत गेली नाही. तब्बल पंधरा तास मध्य रेल्वेची मुंबई-भुसावळदरम्यानची रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली होती. लांब पल्ल्याच्या रेल्वे कसारा घाटाच्या पूर्वी व इगतपुरीपर्यंत दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. इगतपुरी रेल्वे स्थानकात काही रेल्वे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांसाठी एसटी महामंडळाच्या बसची सोय उपलब्ध करून दिली होती. कसारा घाटात डाऊन मार्गावर पडलेली दरड गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर डाऊनच्या एकच मार्गावरून मुंबईला येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे धीम्या गतीने सोडण्यात येत होत्या.

मुंबईकडून कसारा घाटातून दुपारी सोडलेली रेल्वे दुपारी चारच्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्थानकात दाखल घेऊन पुढच्या प्रवासाला रवाना झाली. मध्य रेल्वेची वाहतूक सेवा दरड कोसळल्यामुळे विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे खूप हाल झाले. नाशिक रोड रेल्वे दुपारी गुरुवारी दुपारपासून प्रवासी सायंकाळची मुंबईहून येणारी रेल्वे येणार आहे की नाही, याबाबत उपप्रबंधक कार्यालयात विचारणा करत असताना संबंधित अधिकाऱ्यांना वरतून काही माहिती व आदेश प्राप्त न झाल्याने प्रवासाला योग्य माहिती मिळत नसल्याने प्रवासी आरक्षण तिकीट रद्द करायचे किंवा नाही अशा द्विधा मन:स्थितीत सापडले होते.

शुक्रवारी (ता.२३) मुंबई-बनारस गाडी रद्द करण्यात आली आहे.

--चौकट--

कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प झाली होती. अनेक रेल्वे रद्द करून इतर रेल्वेचे मार्ग बदलण्यात आले होते. बुधवारी मध्यरात्रीनंतर गुरुवारी सायंकाळपर्यंत नाशिक रोड रेल्वे स्थानकातून प्रवाशांना आरक्षण तिकीट रद्द केल्यानंतर जवळपास दीड लाख रुपयांचा रिफंड करण्यात आला.

Web Title: Fifteen hours train jam due to pain in Kasara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.