पाच तासांत पंधरा मूत्रपिंड शस्त्रक्रिया
By Admin | Published: December 24, 2014 12:17 AM2014-12-24T00:17:12+5:302014-12-24T00:20:30+5:30
संदर्भ सेवा रुग्णालयाचा उपक्रम : प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी सरसावले डॉक्टर्स
नाशिक : मुतखड्याच्या व्याधीने त्रस्त असलेले व शस्त्रक्रियेसाठी दोन महिन्यांच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या पंधरा रुग्णांना संदर्भ रुग्णालयातील डॉक्टरांनी मंगळवारी व्याधीमुक्त केले़ राजीव गांधी जीवनदायी योजनेतील मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी असलेली प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी संदर्भमधील डॉक्टरांनी स्वयंस्फूर्तीने राबविले.
सद्य:स्थितीत नागरिकांमध्ये मुतखडा व्याधीचे प्रमाण वाढले असून, शस्त्रक्रियेसाठी संदर्भ रुग्णालयात दोन महिन्यांची प्रतीक्षा यादी आहे़ संदर्भमधील डॉ़ प्रतीक्षित महाजन व त्यांच्या टीमने ही यादी कमी करण्यासाठी मंगळवारी अभिनव उपक्रमाचे आयोजन केले़ नाशिक विभागातील शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या १५ रुग्णांना मंगळवारी बोलविण्यात येऊन पीसीएनएल या अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आल्या़ यातील काही रुग्णांच्या मूत्रपिंडातून २ सेमीपासून, तर ६ सेमीपर्यंत खडे यावेळी काढण्यात आले़
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़सूर्यकांत सोनार व डॉग़ोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनखाली डॉ़ प्रतीक्षित महाजन, डॉ़नीरज गांधी, डॉ़प्रणव छाजेड, डॉ़राजन पटनी, डॉ़नंदन विळेकर यांना भूलतज्ज्ञ डॉ़मुकेश खैरनार, डॉ़अनिल घोलप, डॉ़रश्मी कोचर यांच्यासह डॉ़संजय कुटे व डॉ़नीता गाजरे यांच्यासह सहा परिचारिकांनी मदत केली़ या उपक्रमानंतर अशा प्रकारे व्यापक मोहिम राबविण्यात येवून रुग्णसेवा केली जाईल असा विश्वास डॉ. प्रतीक्षित महाजन यांनी व्यक्त केला.
(प्रतिनिधी)