सिन्नरला पंधरा स्थलांतरित कुटुंबांना शिधा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 06:03 PM2020-03-31T18:03:04+5:302020-03-31T18:03:28+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने येथील युवा मित्रने शहर व परिसरात अडकून पडलेल्या १५ स्थलांतरीत कुटुंबांसह औद्योगिक वसाहतीतील १२ कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढा अन्नधान्याचा शिधा वाटप केला.
सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने येथील युवा मित्रने शहर व परिसरात अडकून पडलेल्या १५ स्थलांतरीत कुटुंबांसह औद्योगिक वसाहतीतील १२ कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढा अन्नधान्याचा शिधा वाटप केला.
सिन्नर-शिर्डी मार्गावरील कुंदेवाडी फाट्यावर जालना जिल्ह्यातील ११ गोसावी कुुटुंबे पाल टाकून राहतात. या कुटुंबातील ३५-४० सदस्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याची माहिती युवा मित्रचे कार्यकारी संचालक सुनील पोटे यांना मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधला. नांदूरशिंगोटे येथील रोजगार मिळणे बंद झाल्याने रोजगाराच्या शोधात या कुटुंबानी फाट्यावर पाल ठोकले आणि कोरोनाचे संकट उभे राहिले. त्यामुळे झोपड्यांमध्येच अडकून पडण्याची वेळ त्यांच्यावर आली. विजयनगरमधील सामाजिक कार्यकर्ते मनोज भंडारी यांच्या किराणा दुकानात अत्यावश्यक वस्तूंची यादी पोहोचविण्यात आली. एका कुटुंबासाठी लागणारा किराणा त्यांनी गोणीत भरून दिला. देवनदीच्या काठावर पाल टाकलेल्या ४ कुटुंबांना व मुसळगाव वसाहतीतील एटलस फाईन केमिकल्सच्या झारखंड व बिहारमधील १४ कुटुंबांतील ६४ सदस्यांनाही किराणा माल पोहोचविण्यात आला. यावेळी तहसीलदार राहुल कोताडे, विलास नाठे, रतन माळी, संताजी जगताप, ग्रामविकास अधिकारी पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
रेवा फार्मा कंपनीकडून २२ हजार ५०० रु पयांचा धनादेश
रोजगारासाठी परिसरात स्थलांतरीत झालेल्या १५-२० कुटुंबांची युवा मित्रमुळे माहिती झाली आणि त्याच्यातील कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये या भावनेतून या उपक्र मात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. गावातील १५ कुटुंबांच्या किराणाचा खर्च उचलण्याची तयारी रेवा फार्मा कंपनीने दाखवत २२ हजार ५०० रु पयांचा धनादेश युवा मित्रकडे सुपुर्द केला. या उपक्र माला मदतीसाठी मुसळगाव वसाहतीतील अनेक कंपन्या पुढे येत असून त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाची भूक भागविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्टाईसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे यांनी सांगितले.