जिल्ह्यात पंधराशे प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:46 AM2018-09-26T00:46:24+5:302018-09-26T00:47:02+5:30
महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या १२ हजार रिक्त जागा त्वरित भराव्यात, आंदोलन काळातील २०१३ पासून ७१ दिवसांच्या पगाराची भरपाई मिळावी यांसह समान काम समान वेतन अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२५) विविध महाविद्यालयांसमोर एकत्र येऊन कामबंद आंदोलन केले.
नाशिक : महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या १२ हजार रिक्त जागा त्वरित भराव्यात, आंदोलन काळातील २०१३ पासून ७१ दिवसांच्या पगाराची भरपाई मिळावी यांसह समान काम समान वेतन अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२५) विविध महाविद्यालयांसमोर एकत्र येऊन कामबंद आंदोलन केले. शहरातील केटीएचम, पंचवटी, के.व्ही.एन. नाईक, भोसला महाविद्यालयांसह जिल्ह्यातील मालेगावची तीन वरिष्ठ महाविद्यालये देवळा, नामपूर, लासलगाव, चांदवड, वणी, सिन्नर, मनमाड, इगतपुरी अशा जिल्हाभरातील पंधराशेहून अधिक महाविद्यालयीन प्राध्यापकांनी या संपात मंगळवारपासून एम.स्फुक्टो संघटनेने पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनात सक्रिय सहभाग सरकारविरोधात घोषणाबाजी केली. प्राध्यापकांच्या स्थानिक स्फुक्टो संघटनेतील सर्व प्राध्यापक सहभागी झाले असून, प्राध्यापकांनी पुकारलेल्या या संपाच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवावी, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे वेतन वाढवावे, जुनी पेंशन योजना राबवावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, अशा मागण्या असल्याचे सिनेट सदस्य तथा स्फुक्टोचे उपाध्यक्ष डॉ. नंदू पवार यांनी सांगितले, तर गोखले एज्युकेशन सोसायटीच्यी बी.वाय.के. महाविद्यालयाव्यतिरिक्त कोणत्याही महाविद्यालयांचे प्राध्यापक या संपात सहभागी झाले नसल्याचे दिसून आले. संबंधित प्राध्यापक ांशी संवाद साधून त्यांनाही संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने आंदोलनापूर्वीच कामबंद करण्याचा इशारा दिलेला असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिक्षण संस्थांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत. त्यामुळे प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, सप्टेंबरपर्यंत वरिष्ठ महाविद्यालयांच्या विविध विद्याशाखांचा पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम पूर्ण झालेला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याचा दावा काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी केला आहे.
भरतीवरील बंदी उठवावी
भरतीवरील बंदी उठवावी यासह विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करू नही प्रश्न सुटत नसल्याने राज्यातील प्राध्यापकांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संघटनेने दोन महिन्यांत तब्बल पाचवेळा राज्यस्तरीय आंदोलने करूनही प्राध्यापकांची एकही मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. यापूर्वी प्राध्यापकांनी ६ आॅगस्टला काळ्या फिती लावून शिक्षक मागणी दिन पाळला होता. त्यानंतर २० आॅगस्टला उच्च शिक्षण सहसंचालक यांच्या विभागीय कार्यालयासमोर प्राध्यापक प्रतिनिधींनी उपस्थित राहून निदर्शने केली होती. त्यामुळे कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
संस्थाचालकांचाही पाठिंबा
जिल्हाभरात प्राध्यापकांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनाला शिक्षण संस्थाचालकांनी तसेच संस्थांच्या कार्यकारिणी मंडळांनीही पाठिंबा दिल्याचे दिसून आले. नाशिकमध्ये क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संथेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सहचिटणीस तानाजी जायभावे, महेश आव्हाड यांनी आंदोलक प्राध्यपकांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे.