नाशिकसाठी रोज पंधरा ते वीस हजार वाढीव डोस हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:15 AM2021-04-02T04:15:17+5:302021-04-02T04:15:17+5:30
नाशिक : शहरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चाचण्यांबरोबरच लसीकरणाचादेखील डाेस वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या नाशिक शहराला ...
नाशिक : शहरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चाचण्यांबरोबरच लसीकरणाचादेखील डाेस वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या नाशिक शहराला लागणाऱ्या डोसपेक्षा किमान पंधरा ते वीस हजार वाढीव डोस द्यावेत, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर आरोग्य संचालक श्रीमती अर्चना पाटील यांनाही त्यांनी पत्र पाठवले आहे.
नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, दररोज रुग्णसंख्येत होणारी वाढ बघता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसत आहे. शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या पंधरा हजार ओलांडून पुढे गेली आहे. त्याचप्रमाणे शहरात बाधितांना बेड्स आणि अन्य साहित्य मिळणे कठीण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिक रुग्णसंख्या वाढू न देता कोरोनावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईचा एक भाग म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्याची गरज आहे. शहरात महापालिका आणि खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू असले तरी लसींचे डोस संपल्याने नागरिकांना माघारी जावे लागत आहे. महापालिकेने मागणी नोंदवूनदेखील पुरेशा प्रमाणात डाेस उपलब्ध होत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे लसींचा मागणीनुसार पुरवठा करताना शहरात लागणाऱ्या लसींच्या डोसच्या तुलनेत पंधरा ते वीस हजार वाढीव डाेसचा पुरवठा करावा, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे.
भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या नाशिक शहरात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आले होते, त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार शहराकरिता वाढीव लसीकरण डोस आवश्यक असल्यास वेळेप्रसंगी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबरोबरच किरीट सोमय्या आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही महापौर कुलकर्णी यांनी पत्र देऊन नाशिककरिता वाढीव डोस मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. इन्फो... कोरोनाचा वाढता संसर्ग बघता आता कोणत्याही एका उपचार पद्धतीवर अवलंबून न राहता कोरोनीलसारखी आयुर्वेदिक औषधे किंवा आर्सेनिक अल्बमसारखी होमिओपॅथिक प्रतिकार शक्ती वाढविणारी औषधे नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. यातील काही औषधांची टंचाईदेखील जाणवत आहे, इतकी पारंपरिक औषधे प्रभावी ठरत आहे. त्यामुळे महापालिकेने अशा पारंपरिक औषधांचादेखील उपयोग करावा, असे आवाहन महापौरांनी आयुक्तांना एका पत्राव्दारे केले आहे.