चार दिवसांपासून पंधरा गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:10 AM2021-06-03T04:10:59+5:302021-06-03T04:10:59+5:30
सायखेडा : गोदाकाठ भागातील जवळपास पंधरा गावांतील वीजपुरवठा सलग चौथ्या दिवशी बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, ...
सायखेडा : गोदाकाठ भागातील जवळपास पंधरा गावांतील वीजपुरवठा सलग चौथ्या दिवशी बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, छोटे उद्योग बंद पडले आहेत. जनावरांना पाणी मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
चार दिवसांपूर्वी गोदाकाठ भागात जोरदार वादळ आले होते, पावसाने हजेरी लावली होती. या वादळात करंजगाव भागात विजेचे खांब पडले, तेव्हापासून म्हाळसाकोरे, औरंगपूर सबस्टेशन अंतर्गत येणारे भेंडाळी, म्हाळसाकोरे, मांजरगाव, चापडगाव, करंजगाव, शिंगवे, गोदानगर, शिंगवे, सोनगाव, बागलवाडी, औरंगपूर, तळवाडे, महाजनपूर, पिंपळगाव निपाणी, भुसे या गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
चार दिवसांपासून सर्व गावे अंधारात आहेत. या भागातील बहुतांशी नागरिक वस्तीवर राहतात. शेतातील विहिरीतून पंपाच्या साहाय्याने पाणी काढून पिण्यासाठी वापरतात जनावरांनादेखील पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्याशिवाय माणसे आणि जनावरे मेटाकुटीला आली आहेत.
वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी काम करत असले तरी सलग चार दिवस वीज पुरवठा सुरु होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या ठिकाणी नवीन काम उभे करायचे असल्यास ठेकेदार एका दिवसात शेकडो फूट अंतररावर वीज उभी करतात, मोठाले खांब उभे करतात. त्यात नफा असतो पण इथे कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा होणार नसल्याने ठेकेदार मनात येईल तेव्हा आणि हळुवार काम करत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे.
---------------------
यंदाचा पहिलाच पाऊस आला आणि वीजेचे खांब पडले, वादळ येण्यापूर्वी आणि पावसाळा सुरु होण्याअगोदर संभाव्य कामे केली असती तर आज सलग चार दिवस वीज पुरवठा खंडित राहाण्याची वेळ आली नसती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
- रवींद्र देविदास खालकर, भेंडाळी
-------------------
करंजगाव येथे वाकलेला पोल. (०२ सायखेडा)
===Photopath===
020621\02nsk_12_02062021_13.jpg
===Caption===
०२ सायखेडा