अस्वली पुलाचेही काम रखडल्याने पंधरा गावांचा घोटीशी संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 10:36 PM2022-07-16T22:36:19+5:302022-07-16T22:38:30+5:30
गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव ते काननवाडी या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, याबाबत संबंधित विभागाला अनेकवेळा निवेदन दिले होते. मात्र, त्याकडे संबंधित विभागाने अजून लक्ष दिलेले नाही. याच पार्श्वभूमीवर नांदगाव ते काननवाडी फाटा, काननवाडी ते नांदुरवैद्य या रस्त्याचे काम केले असून, काननवाडी ते मुंढेगाव हा रस्ता कामाविना तसाच आहे. त्यामुळे अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असूनही खराब रस्त्यामुळे बससेवा बंद झाल्याने परिसरातील सुमारे दहा ते पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे.

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव ते काननवाडी या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने अक्षरशः या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून, संबंधित विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मनविसेतर्फे अनेकवेळा संबंधित विभागाकडे केली असूनही आजपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. निवडणुकीत वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मात्र मतदारसंघात पुन्हा फिरकलेही नाहीत.
ओंडओहोळ पुलाचे काम संथगतीने
जानोरी - अस्वली या रस्त्यावरील ओंढओहळ पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अतिशय संथगतीने सुरू असून, या कामाला विलंब का लागला? संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या पुलाच्या रखडलेल्या कामामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, परिसरातील दुग्ध व्यावसायिक, कामगार, विद्यार्थी आदींना बससेवा बंद झाल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, अर्धा किलोमीटर अंतरासाठी मुंढेगाव - गोंदेमार्गे १४ किलोमीटरचा वळसा घालून अस्वली येथे यावे लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व इतर संबंधित व्यक्तींवर कारवाई करून काम पूर्ण करून घ्यावे, अशा अनेक विषयांवर नांदगाव बुद्रुक येथील मनसेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, गणेश मुसळे, बाजीराव गायकर, विजय गायकर, रंगनाथ खातळे, समाधान गायकर, योगेश गायकर, दीपक गायकर, संदीप यंदे, आनंदा कर्पे, काका कर्पे, सुभाष मुसळे, शरद मुसळे, वैभव दातीर, किरण बोंबले, किरण तांबे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मुंढेगाव - काननवाडी रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून, अनेकवेळा निवेदन देऊनही संबंधित विभागाने याकडे डोळेझाक केली आहे. याविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून, या रस्त्याचे काम करणारा ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
- आत्माराम मते, जिल्हा उपाध्यक्ष, मनविसे, नाशिक.