खड्डे बुजवण्यासाठी पंधरा वर्षांत ३०६ कोटी खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:12 AM2019-09-29T00:12:44+5:302019-09-29T00:13:12+5:30

पावसाळ्यात पडणारे खड्डे ही सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असली तरी महापालिकेच्या दृष्टीने मात्र जणू इष्टापत्तीच ठरत आहे. सध्याची अशा प्रकारची स्थिती असली तरी गेल्या पंधरा वर्षांत ३०६ कोटी रुपयांचा खर्च खड्डे बुजवणे आणि रस्ता दुरुस्तीवर झाला आहे.

 In the fifteen years to fill the pits 2 crore pits | खड्डे बुजवण्यासाठी पंधरा वर्षांत ३०६ कोटी खड्ड्यात

खड्डे बुजवण्यासाठी पंधरा वर्षांत ३०६ कोटी खड्ड्यात

Next

नाशिक : पावसाळ्यात पडणारे खड्डे ही सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असली तरी महापालिकेच्या दृष्टीने मात्र जणू इष्टापत्तीच ठरत आहे. सध्याची अशा प्रकारची स्थिती असली तरी गेल्या पंधरा वर्षांत ३०६ कोटी रुपयांचा खर्च खड्डे बुजवणे आणि रस्ता दुरुस्तीवर झाला आहे. त्यानंतरदेखील रस्त्याची दुरवस्था कायम आहे. त्यामुळे खरोखरीच एवढा खर्च होतो का आणि झाला असेल तर तो सत्कारणी लागला आहे काय? याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे संपूर्ण शहरात रस्त्यांची चाळणी झाली आहे. शहरातील मोजके रस्ते सोडले तर खड्डा नाही असा एकही रस्ता सापडणे कठीण आहे. शहरातील रस्त्यावर खड्ड्यातून माग काढून वाहन चालविणे म्हणजे कसरत ठरली आहे. वाहनांचे अपघात आणि नागरिकांचे मणके खिळखिळे होईल अशी स्थिती आहे. मात्र, महापालिकेने रस्त्याच्या दर्जावर पांघरूण घालत वरुण राजालाच दोषी ठरविणे सुरू केले आहे. शहरात सातत्याने पाऊस सुरू आहे. मध्यंतरी पाऊस थांबला असे वाटल्याने खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु परतीच्या पावसामुळे पुन्हा ‘जैथे थे’ परिस्थिती झाली, असा प्रशासनाचा दावा आहे. तथापि, महापालिकेचा हा दोषारोप आजचा नसून दरवर्षीचा असतो. रस्त्यांच्या दर्जाच्या काळजीपेक्षा खड्डे भरणे आणि दुरुस्त करणे यावर अधिक खर्च होतो. महापालिकेच्या वतीने दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली जाते.  त्यानंतर खडी, मुरूम, डांबर पुरवण्यासाठी पुरवठादार नेमले जातात. परंतु गेल्या पंधरा वर्षांत खड्डे दुरुस्ती म्हणजे जणू उधळपट्टी ठरली आहे.
गेल्या पंधरा वर्षांत महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी केला जाणारा खर्च चक्रावून टाकणारा आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी तब्बल ३०६ कोटी रु पयांचा खर्च झाला आहे. महापालिकेच्या वार्षिक तरतुदींचा आढावा घेतला तर दरवर्षी अंदाजपत्रकातील वेतन भत्ते आणि अन्य बांधील खर्च वगळता विकास (भांडवली) कामांसाठी सुमारे ३०० कोटी रु पये उपलब्ध होतात असतात. गेल्या पंधरा वर्षांत रस्ते दुरुस्तीवर झालेला खर्च हा एका अंदाजपत्रकीय वर्षातील भांडवली कामांसाठी होणाऱ्या खर्चाइतका किंवा त्यापेक्षाही अधिक आहे.
२०१०-११ या वर्षात शून्य रुपये खर्च
रस्ते दुरुस्तीवर गेल्या पंधरा वर्षांच्या तुलनेत झालेल्या खर्चाचा आढावा घेतला तर सर्वाधिक खर्च सर्वाधिक ४२.९३ कोटी रु पयांचा खर्च २०१५-१६ मध्ये तर सर्वांत कमी खर्च २००५-०६ मध्ये झाला होता हा खर्च १.४६ कोटींचा खर्च इतका होता. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे २०१०-११ मध्ये मात्र एक रु पयादेखील रस्ते दुरुस्तीवर खर्च झाला नसल्याने यावर्षी नक्की काय घडले होते आणि खर्च का होऊ शकला नाही हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

Web Title:  In the fifteen years to fill the pits 2 crore pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.