पंधरा वर्षांतील कामे वर्षभरात

By Admin | Published: October 19, 2015 10:11 PM2015-10-19T22:11:18+5:302015-10-19T22:11:50+5:30

भाजपाचा दावा : सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त जाणार घराघरात

Fifteen years of work in the year | पंधरा वर्षांतील कामे वर्षभरात

पंधरा वर्षांतील कामे वर्षभरात

googlenewsNext

नाशिक : गेल्या पंधरा वर्षांत कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आघाडी सरकार होते. त्यांच्या कार्यकाळात जे त्यांना जमले नाही, ते आम्ही वर्षभराच्या भाजपा सरकारच्या कार्यकाळात करून दाखविल्याचा दावा भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे यांनी केला.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनापासून इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जलयुक्त शिवार अभियान, सौर ऊर्जा पंपवाटप अभियान यांसह काही महत्त्वपूर्ण घडामोडी या वर्षभरात झाल्याचा दावा त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. वर्षपूर्तीनिमित्त राज्यभरात २३ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम ३१ आॅक्टोबर रोजी राज्यातील ९० हजार बूथवर भाजपाच्या वतीने महालोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आघाडी सरकारच्या काळात ७० हजार कोटींचा सिंचनाचा घोटाळा झाला, तर आमच्या वर्षभराच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यभर लोकसहभागातून यशस्वी उपक्रम राबविण्यात आला असून, त्यामुळे सहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्यात निव्वळ लोकसहभागाची रक्कम ३०० कोटींच्या घरात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथे स्मारक, तसेच लंडन येथील घर ३५ कोटींना विकत घेतले आहे. तसेच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचेही स्मारक होणार आहे. वर्षभराच्या कार्यकाळात भाजपा सरकारने केवळ उद्योग, शेतकरी, सिंचनच नव्हे तर समाजकार्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी प्रास्ताविकात सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त संवाद साधला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, गिरीश पालवे, सुरेश पाटील, प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनील केदार, संभाजी मोरुसकर, सतीश कुलकर्णी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Fifteen years of work in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.