पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २५ एप्रिलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:15 AM2021-03-16T04:15:04+5:302021-03-16T04:15:04+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) कोरोनाच्या संकटामुळे दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून यावर्षी २५ एप्रिलला ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करण्यासोबतच शुल्क भरण्यासाठी ९ ते २१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आल्या असून संकेतस्थळावर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा यंदा २५ एप्रिलला एकाच वेळी घेतली जाणार असून शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला प्रविष्ठ होता येणार आहे. कोरोनाचे सावट अद्याप कमी झाले नसल्याने ही परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर होण्यासही विलंब झाला होता. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील ५७ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातील १ हजार ६४१ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले होते.