द्राक्ष, भाजीपाला वाहतुकीला पन्नास टक्के सबसिडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 10:38 PM2020-12-24T22:38:00+5:302020-12-25T01:07:30+5:30
नाशिक : कृषी रेल्वेसह देशभरात वाहतुकीसाठी धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये पालेभाज्या तसेच फळांना सरसकट पन्नास टक्के सबसिडी देण्याचा निर्णय ...
नाशिक : कृषी रेल्वेसह देशभरात वाहतुकीसाठी धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये पालेभाज्या तसेच फळांना सरसकट पन्नास टक्के सबसिडी देण्याचा निर्णय केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला, द्राक्ष, ॲपल बोरसह सर्वच प्रकारच्या फळांच्या उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
शेतमाल वाहतुकीसाठी गेल्या चार महिन्यांपासून देवळाली कॅम्प येथून परराज्यात जाणारी कृषी रेल्वे सुरू झालेली आहे. या रेलगाडीमधून शेतकऱ्यांना आपला शेतमाल परराज्यात पाठविण्यासाठीची विशेष सुविधा निर्माण झालेली आहे. सुरुवातीला कृषी रेल्वे आठवड्यातून एकच दिवस धावत होती. शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता सध्या आठवड्यातून तीन दिवस कृषी रेल धावत आहे. परंतु द्राक्ष, ॲपल बोर तसेच काही भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर पन्नास टक्के सबसिडी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता.
सर्वच प्रकारची फळे आणि भाजीपाला वाहतुकीवर पन्नास टक्के सबसिडी मिळावी यासाठी जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे तगादा लावला होता. शेतकऱ्यांची मागणी योग्य असल्याने त्यांनी यासंदर्भात कृषिमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता.
त्यानुसार केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी मंत्रालय पातळीवरील रेल आणि कृषी प्रशासनाशी चर्चा करून कृषी रेलमध्येच नव्हे तर देशभरात धावणाऱ्या सर्वच माल वाहतूक रेलगाड्यांमध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला तसेच द्राक्ष,ॲपल बोरसह सर्व प्रकारच्या फळांच्या वाहतुकीसाठी सरसकट पन्नास टक्के सबसिडी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील दहा हजार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.