महिनाभरानंतर पुन्हा जिल्ह्यात पन्नासवर बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:15 AM2021-05-23T04:15:02+5:302021-05-23T04:15:02+5:30
नाशिक : जिल्ह्यात महिनाभरानंतर पुन्हा पन्नासहून अधिक तब्बल ५८ बळींची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतील वाढ कमी ...
नाशिक : जिल्ह्यात महिनाभरानंतर पुन्हा पन्नासहून अधिक तब्बल ५८ बळींची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतील वाढ कमी झालेली असली तरी गंभीर रुग्ण दगावण्याचे प्रमाण शनिवारी अचानकपणे वाढल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या गत आठवडाभरापासून सातत्याने बाधितांच्या तुलनेत अधिक राहात असल्याने पुन्हा बाधितसंख्येत थोडीशी घट आली आहे. शनिवारी नवीन १२२२ रुग्ण वाढले असून १३१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळेच शनिवारी एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या १६०६६ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ४५६, नाशिक ग्रामीणला ७२६ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ४० रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १८, ग्रामीणला ३९ तर मालेगाव मनपा क्षेत्रात १ असा एकूण ५८ जणांचा बळी गेला आहे. ग्रामीणमधील बळींची संख्या पुन्हा शहरातील बळींच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे. गत महिन्यात २३ एप्रिलनंतर बळींच्या संख्येने पुन्हा पन्नासचा आकडा ओलांडला आहे.
इन्फो
प्रलंबित अहवाल साडेचार हजारांवर
जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा साडेचार हजारांचा आकडा ओलांडून ४५२९ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे सर्वाधिक ३१२५, नाशिक मनपाचे १२६१ तर मालेगाव मनपाच्या १४३ अहवालांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग अद्याप कायम असल्यानेच तेथील अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाणदेखील अधिक आहे.