पन्नास टक्के उपस्थिती नावालाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 AM2021-03-24T04:13:59+5:302021-03-24T04:13:59+5:30
नाशिक- राज्यात वाढता कोरेाना लक्षात घेऊन शासनाने शासकीय कार्यालयात पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच काम करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ...
नाशिक- राज्यात वाढता कोरेाना लक्षात घेऊन शासनाने शासकीय कार्यालयात पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच काम करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आता शासकीय कार्यालयात कोरोनाचे रूग्ण आढळून सुध्दा केवळ मार्च एंडिंगच्या कामांची धावपळ असल्याने शंभर टक्के उपस्थितीत काम केले जात आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचे महासंकट प्रथमच आल्यानंतर सुध्दा अशाच प्रकारचे आदेश शासनाने दिले होते. त्यावेळी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी मुळातच महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्याचे कारण दिले होते आणि शंभर टक्के उपस्थितीतच काम केले होते आताही तशीच अवस्था आहे. मुळातच कोरोनामुळे महापालिका आर्थिक अडचणीत असल्याने मार्च अखेरीस मुळे यंत्रणा अत्यंत सक्रिय आहे. विशेष म्हणजे महापालिकेत झालेल्या तपासणीत १४ कर्मचारी कोरोना बाधित आढळले असतानाही शंभर टक्के उपस्थिती आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेत देखील अशीच शंभर टक्के उपस्थिती आहे. याठिकाणी देखील पंचवीसहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. मात्र, त्यानंतरही मार्च अखेरीस मुळे अखर्चित निधी खर्च करण्यासाठी सर्व मनुष्यबळ कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात देखील अशाच प्रकारे नाईलाजास्तव कर्मचाऱ्यांना बोलवावे लागत आहे. त्याचे कारण म्हणजे या कार्यालयात देखील मार्च अखेरीस गर्दी आहे.
इन्फो...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अनेक शासकीय कार्यालये आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी, तहसील कार्यालये, संजय गांधी निराधार योजना, तलाठी कार्यालय, कोषागार कार्यालय या सर्वच ठिकाणी कामे असल्याने त्याठिकाणी नागरिकांची गर्दी असते. मुळात कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यात गर्दी यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात बऱ्यापैकी उपस्थिती दिसून आली.
इन्फो...
कोरोना असला तरी महापालिका थांबत नाही. सर्वच कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे. शिवाय राजकीय नेते, नगरसेवक, ठेकेदार, कार्यकर्ते आणि कामासाठी येणारे नागरिक अशी गर्दी महापालिकेत होती त्यातच वैद्यकीय विभागात भरतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. नगररचनात देखील नेहमीप्रमाणे वास्तुविशारद आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमुळे हा विभाग हाऊसफुल्ल होता.
इन्फो...
जिल्हा परिषदेत मार्च अखेरीस मुळे कर्मचारी संख्या नियमितपणेच आहे. खाते प्रमुखांना गर्दी नियंत्रित करण्याचे अधिकार दिले असले तरी मुळात कर्मचारीच शंभर टक्के येत असल्याने याठिकाणी गर्दी वाढणारच. शिवाय राजकीय नेते सदस्यांना कोण अडवणार असे एकूण चित्र होते.
कोट...
महापालिकेत तसे नियमित येत असतो. येथे कायम एवढीच गर्दी असते. राज्य शासनाने आदेश दिले असले तरी महापालिकेत तुडुंब गर्दी असते. आयुक्तांनी मध्यंतरी अभ्यागतांच्या संख्येवर मर्यादा घातली तरी सुरक्षा रक्षकांकडून राजकीय नेते, नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते यांना फार अडवले जात नाही. सामान्य नागरिकांना प्रवेश देण्यासाठी साडे तीन वाजेची वेळ सांगितली जाते. मात्र अन्य नागरिक याच ठिकाणी गर्दी करून असतात.
- तुषार पवार, नाशिक
कोट...
जिल्हा परिषदेत नियमित कामासाठी यावे लागते. कोरोना असला तरी आता कामे करावीच लागतात. अधिकाऱ्यांशी संबंध असतात. त्यामुळे कामानिमित्त त्यांच्याकडे यावेच लागते. शासनाने मर्यादा घातली असली तरी येथे गर्दी होतेच. मात्र, येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जाते. ही दिलासादायक बाब आहे.
- प्रतीक देशमुख, नाशिक.
कोट...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अनेक शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांना यावेच लागते. ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असती तर अधिक बरे झाले असते. जिल्हाधिकाऱ्यांकडे जाताना अभ्यागतांची बऱ्यापैकी तपासणी केली जाते. मात्र अन्य शासकीय कार्यालयात इतकी बारकाईने तपासणी होत नाही. सध्या मार्च अखेरीस असल्याने कामासाठी जावे लागते आहे.
- चंद्रकांत हाके, सातपूर
इन्फो...