पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्तासाठी तैनात राहणाऱ्या चारशे होमगार्डचे ५२दिवसांचे मानधन थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 01:57 PM2021-06-30T13:57:37+5:302021-06-30T14:02:30+5:30
पोलिसांप्रमाणेच होमगार्डवरसुध्दा बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण असताना त्यांना मानधनाच्या रकमेपासून वंचित ठेवले जात असल्याने प्रशासकीय व्यवस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
संजय शहाणे, नाशिक : कोरोनाशी दोन हात करताना पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्तासाठी दिवस-रात्र शहरातील रस्त्यांवर तैनात राहणाऱ्या गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांना मागील दोन महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा कायम आहे. शहरात सुमारे चारशे होमगार्डवर मानधन न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाच्या काळात चोख बंदोबस्तावर हजर राहून नाकाबंदी, फिक्स पॉइंटवर कर्तव्य बजावूनदेखील मागील दोन महिन्यांपासून होमगार्डच्या पदरात मानधनाची रक्कम पडलेली नाही. मात्र ही व्यथा सांगू कुणाकडे? अशीच काहीशी अवस्था सध्या होमगार्डची झाली आहे.
शहरातील भद्रकाली, अंबड, सातपुर, पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, इंदिरानगर, सरकारवाडा, गंगापुर, नाशिकरोड, मुंबईनाका, उपनगर, देवळाली कॅम्प अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बंदोबस्तासाठी मागील चार महिन्यांपासून होमगार्ड पोलिसांच्या मदतीला रस्त्यावर उभे आहेत. आगामी गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. पोलिसांप्रमाणेच होमगार्डवरसुध्दा बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण असताना त्यांना मानधनाच्या रकमेपासून वंचित ठेवले जात असल्याने प्रशासकीय व्यवस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नाशिक शहरातील सर्वच पोलिस ठाण्यात पोलिसांच्या बंदोबस्तासाठी सुमारे चारशे होमगार्ड मदतीला घेण्यात आले आहे परंतु जानेवारीचे ३१दिवस, एप्रिलचे दहा दिवस, आणि मे महिन्याचे अकरादिवस असे एकूण ५२ दिवस कोरोना महामारी काळात जीवाची परवा न करता पोलिसांच्या बरोबरीने नाकाबंदी, गस्तीवर कर्तव्य बाजावूनसुध्दा अद्याप मानधनाची रक्कम चारशे होमगार्डच्या पदरात पडलेली नाही हे विशेष!