घरे नावावर करण्यासाठी लढा
By Admin | Published: October 27, 2016 11:24 PM2016-10-27T23:24:34+5:302016-10-27T23:36:12+5:30
आरोग्याचा प्रश्न : सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविण्याची गरज
सिन्नर : गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असतानाही घरे स्वत:च्या नावावर नसल्याची सर्वात मोठी समस्या चार क्रमांकाच्या प्रभागातील नागरिकांची आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून लढा सुरू आहे.
प्रभाग क्रमांक चारची लोकसंख्या ४ हजार ३९२ आहे, तर मतदारसंख्या २ हजार ६७७ आहे. पुरुष मतदार १ हजार ४०६ असून, महिला मतदार १ हजार २७१ आहेत. या प्रभागात वैदूवाडी, जोशीवाडी, खर्जे मळा, कुंभार भट्टी, माकडवाडी, गौतमनगर, मांगवाडा, पोलीस वसाहत, पाण्याची टाकी, पंचायत समितीजवळील भाग या परिसराचा समावेश होतो.
उत्तर भागात मंगल शिंदे घर ते गोंदेश्वर पाण्याची टाकी ते खर्जे मळा ते सातपुते मळा, पूर्व भागात सातपुते मळा ते तहसील कार्यालय दक्षिण कोपरा. दक्षिण भाग तहसील कोपरा ते हुतात्मा चौक. आणि पश्चिम भागात हुतात्मा चौक ते सोमावडारी घर ते अभिमन्यू चव्हाण ते विष्णू पाबळे दुकान ते रेडी गोडावून ते दक्षिणेकडे पंचायत समिती उत्तर कोपरा ते संत गोरोबा पतसंस्था नायगाव रोड ते मंगल शिंदे घर अशा प्रभाग चारच्या चतु:सीमा आहेत.
पूर्वी हा परिसर प्रभाग क्रमांक एक मध्ये होता. नव्या प्रभागरचनेत हा परिसर प्रभाग चार क्रमांक म्हणून ओळखला जात आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागाचे प्रतिनिधित्व माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगसेवक विठ्ठल उगले, मल्लू पाबळे, मंगला जाधव व शीतल कानडी यांनी करतात. या प्रभागात काही गटारी व अंतर्गत रस्त्याची कामे मार्गी लागली आहेत. पाण्याच्या टाकीजवळ कॉँक्रीटीकरण झाले असून, प्रभागात पथदीप बसविण्यात आले आहेत.
गंगावेस ते म्हसोबा मंदिरमार्गे हुतात्मा स्मारकापर्यंत बारा मीटर लांबीचा फूटपाथसह रस्ता झाला आहे. खर्जे मळ्यात बगिचाचे काम प्रगतिपथावर आहे. (वार्ताहर)