गरिबांच्या प्रश्नांसाठी लढा उभारावा लागेल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:22 PM2020-02-02T23:22:46+5:302020-02-03T00:22:03+5:30
स्थानिकांना स्थानिक रोजगार मिळाला पाहिजे, पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या व अशा अनेक मागण्यांसाठी शासनाकडून गरिबांचे व आदिवासींचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी मोठा लढा उभारावा लागेल, असे आवाहन रविवारी हरसूल येथील आयोजित किसान सभेच्या जाहीर सभेत माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी केले.
त्र्यंबकेश्वर : जंगल, जमिनी आदिवासींच्या असून, सरकार वनदावे देताना अवास्तव कागदपत्रांची मागणी करून गरिबांची हेळसांड करीत आहे. आदिवासींच्या शिक्षणाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करीत आहे. घरकुलांचे बांधकाम झालेले असताना घरकुल हप्ते मिळत नाहीत. स्थानिकांना स्थानिक रोजगार मिळाला पाहिजे, पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या व अशा अनेक मागण्यांसाठी शासनाकडून गरिबांचे व आदिवासींचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी मोठा लढा उभारावा लागेल, असे आवाहन रविवारी हरसूल येथील आयोजित किसान सभेच्या जाहीर सभेत माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी केले. सभेचे आयोजन किसान सभेचे सेक्रेटरी इरफान शेख यांनी केले होते.
गावित यांनी सांगितले की, सरकारला भरणाऱ्या कराच्या तुलनेत गरिबांना सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. दिवसेंदिवस महागाई वाढत असून, शासन महागाई रोखण्यात कमी पडत आहे. गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किमती खूप वाढत आहे. गरिबांना आपल्या रोजगार व हक्कांसाठी मोठा लढा उभा करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.
हरसूल येथील आयोजित सभेत शेतकरी व आदिवासींच्या विविध प्रश्नांवर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आदिवासींचा निधी आदिवासींसाठी पूर्णपणे वापरला पाहिजे. आदिवासींचे वनदावे मंजूर केले पाहिजे, असे मत किसान सभेचे सेक्रेटरी इरफान शेख यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर सभेच्या अध्यक्षस्थानी रमेश बरफ (जि. प. सदस्य, ठाणापाडा गट) यांच्या समवेत सावळीराम पवार, इरफान शेख, सभापती ज्योती राऊत, देवराम मौळे, जावेद जहागीरदार, शाफिक शेख, नामदेव मोहोंडकर, महेश टोपले आदींसह अनेक मान्यवर व
शेकडो किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.