पर्यावरण टास्क फोर्ससाठी इच्छुकांमध्ये चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:35+5:302021-06-11T04:11:35+5:30
अनधिकृत उत्खननाबाबत जनतेच्या तसेच पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी तसेच या क्षेत्रात होणारा विकास ...
अनधिकृत उत्खननाबाबत जनतेच्या तसेच पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी तसेच या क्षेत्रात होणारा विकास यांचा समन्वय साधण्यासाठी स्थापन टास्क फोर्सची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा खणिकर्म अधिकारी आनंद पाटील उपस्थित होते.
या बैठकीसाठी अनेक इच्छुकांनी हजेरी लावली. त्यामध्ये वृक्षसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या अधिक होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरणाशी निगडित हा विषय असल्याने जल, वायू, पुरातत्व क्षेत्रातील तज्ज्ञ, गौणविषयक जाणकार, कायदेविषयक अभ्यासक, पौराणिक वारसा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, अशा अनेक क्षेत्रातील मान्यवर अपेक्षित आहेत. एखाद्या क्षेत्रात काम करणे आणि त्यामध्ये पारंगत असणे वेगळे असल्याचे सांगून गाढे अभ्यासक असल्यास पर्यावरणाशी निगडित अनेक मुद्द्यांवर व्यापक कामे सकारात्मक होऊ शकतील असे सांगितले.
ज्यांना पर्यावरण क्षेत्रात काम करावयाचे आहे त्यांनी केवळ टास्क फोर्समध्येच कामे केली पाहिजे असे नाही, तर आहे त्या संस्था आणि उपक्रमांच्या माध्यमातून कामे सुरू ठेवली पाहिजेत, असेही सुचविले.