शिष्यवृत्ती प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:38 AM2021-01-30T01:38:36+5:302021-01-30T01:39:15+5:30
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम काढण्यासाठी हॅकरकडून शाळांचे लॉगिन आयडी तयार केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिले आहेत.
नाशिक : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम काढण्यासाठी हॅकरकडून शाळांचे लॉगिन आयडी तयार केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिले आहेत.
धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम काढण्यासाठी हॅकरने शाळेचे लॉगिन आयडी तयार करून शिष्यवृत्तीवर डल्ला मारल्याचे वृत्त लोकमतने गुरुवारी (दि.२८) प्रकाशित केले होते. या वृत्ताची मंत्री वर्षा गायकवाड यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी शुक्रवारी (दि.२९) नाशिक दौऱ्यावर असताना शिक्षण उपसंचालक कार्यालयात भेट देऊन सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. कोविड पश्चात सुरू झालेल्या शाळांची माहिती घेतानाच विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांच्या चाचण्या, बाधित शिक्षकांची संख्या याविषयीही त्यांनी चौकशी केली. शिक्षकांच्या तक्रार निवारणाचाही त्यांनी आढावा घेतला.