पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष व इतरांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 05:24 PM2020-09-30T17:24:12+5:302020-09-30T17:24:12+5:30
नाशिकरोड : तपवोनरोडवरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे मंगळवारी शालेय फी संबंधात घोषणा देत आंदोलन करुन करोना विषाणूचा प्रादुर्भाव असतानाही सुरक्षित अंतर न ठेवता पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे व इतरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड : तपवोनरोडवरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे मंगळवारी शालेय फी संबंधात घोषणा देत आंदोलन करुन करोना विषाणूचा प्रादुर्भाव असतानाही सुरक्षित अंतर न ठेवता पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे व इतरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपोवनरोड, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे मंगळवारी सकाळी अकरा वाजता शालेय फी संदर्भात भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देत आंदोलन करण्यात आले. आंदोलनाबाबत पूर्वपरवानगी घेण्यात आली नाही. करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई असताना तोंडाला मास्क न लावत आंदोलन केले. याप्रकरणी गिरीश पालवे, सागर धर्माधिकारी, प्रमोद शिंदे, सुरेश शिंदे, डॉ. समीर आहिरे व इतर 80 ते 90 जणांविरुध्द उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहिता छळप्रकरणी गुन्हा
नाशिकरोड : विवाहितेचा मानसिक, शारीरीक छळ करत शिवीगाळ करत घरातून हाकलून दिल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडको, राणाप्रताप चौक येथील विवाहिता वीणा प्रसाद खोडे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, 26 फेब्रुवारी 2018 रोजी प्रसाद दत्ता खोडे (रा.हरिवंश बंगलो, आराधना सोसायटी, खोडदेनगर, उपनगर) यांच्यासोबत लग्न झाले. लग्नानंतर एक वर्षापर्यंत सासरकडे सर्वकाही गुण्यागोविंद्याने सुरु होते. एक वर्षांनी मुलगा झाल्यानंतर मुलाच्या जन्म प्रमाणपत्राकरिता पती प्रसाद खोडे यांना विवाह प्रमाणपत्र काढण्यास वेळोवेळी सांगितले. त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. होंडाई शो रुममध्ये मॅनेजर पदावर काम करत असल्याचे त्यांनी खोटे सांगितले. याबाबत विचारणा केली असता पती प्रसादने बेदम मारहाण केली. विणा खोडे या कामावर जिन्स आणि टॉप्स घालून जात असल्याने सासू सास-यांनी पती प्रसादचे कान भरले. सासरच्यांनी पती-पत्नीत दुरावा निर्माण केला. पती प्रसाद, सासू उषा खोडे, सासरे दत्ता हरिभाऊ खोडे, राजश्री माधव वरसाळे, विवेक दत्ता खोडे, उषा खोडे यांनी वीणा खोडे हिचा शारीरीक, मानसिक त्रास देत छळ केला, तसेच शिवीगाळ करुन घरातून हाकलून दिले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोक्यात बिअरची बाटली फोडली
नाशिकरोड : येथील गोसावीवाडी दत्तमंदिराजवळ युवकाच्या डोक्यात एकाने बिअरची बाटली फोडून व कमरेवर मारुन जखमी केल्याचा प्रकार घडला.
जयभवानीरोड, आवटे मळा, सृष्टी अपार्टमेंट येथील युवक आकाश चंद्रकांत नेवडे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पाच-सहा वर्षापूर्वी मी गोसावीवाडीत रहात होतो. त्यावेळी करन (पूर्ण नाव माहित नाही ) याच्याशी ओळख झाली. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आंबेडकर रोड येथे चहा पिण्यासाठी मी जात असताना गोसावीवाडीतील दत्त मंदिराजवळ करन भेटला. करनने धक्का मारत तुझा फॅब्रिकेशनचा धंदा खूप चांगला आहे, त्यामुळे तू खूप माजला आहे, असे म्हणून बिअरची रिकामी बाटली माझ्या डोक्यात मारली. कमरेवर मारुन जखमी केले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.