मालेगावी सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 08:21 PM2020-12-25T20:21:56+5:302020-12-26T00:39:42+5:30
मालेगाव मध्य : बँक ऑफ बडोदा येथे ग्राहकाशी वाद झाल्याने सुरक्षा रक्षकाने त्याच्या जवळील स्प्रे फवारून लोकांना त्रास देऊन दुखापत केली व बँकेचे वातावरण दूषित केल्याप्रकरणी संशयित सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तन्वीर अहमद नुरुलहुदा (५०, रा.इस्लामनगर) यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास एका ग्राहकाचे काउंटरवर काम न झाल्याने तक्रार करण्यासाठी बँकेचे व्यवस्थापकाकडे गेला असता व्यवस्थापकाशी वाद झाला. यावेळी सुरक्षा रक्षक शांताराम आहिरे येथे आला व ग्राहकाशी बोलू लागला. तेव्हा तू मध्ये बोलू नको असे सांगितले. याचा राग आल्याने सुरक्षा रक्षक आहिरे याने आपल्याजवळील स्प्रे काढून संपूर्ण बँकेत हवेत फवारला व बँकेचे प्रवेशद्वार बंद करून घेतले. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होवू लागला. काहींना खोकला तर जळजळ होवू लागली होती. ज्यांच्या डोळ्यात स्प्रे गेला त्यांना समोरचेही दिसत नसल्याने ते एकमेकांना धडकून पडू लागले. त्यामुळे उपस्थित वृध्द महिला, लहान मुलांसह लोकांनी बाहेर जाण्यासाठी आरडाओरड सुरू केल्याने बँकेत गोंधळ उडाला होता. या प्रकाराची माहिती समजताच एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेझ, नगरसेवक अयाज हलचल, राशिद अय्युब, लईक अहमद यांनी धाव घेऊन नागरिकांना शांत केले. पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. विषय बँकेशी संबंधित असल्याने दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी संशयित सुरक्षा रक्षक शांताराम आहिरे ताब्यात घेतले असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत.