वीज देयकाची थकबाकी भरावी ; महावितरण कंपनीकडून नाशिक जिल्ह्यात विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:47 AM2018-11-25T00:47:36+5:302018-11-25T00:47:58+5:30
वीज बिलाच्या वाढत्या थकबाकीला प्रतिबंध करण्यासाठी महावितरण कंपनीकडून नाशिक जिल्ह्यात गुरुवारपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वीज बिलाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.
नाशिकरोड : वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीला प्रतिबंध करण्यासाठी महावितरण कंपनीकडून नाशिक जिल्ह्यात गुरुवारपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वीज बिलाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या एकूण ७ लाख ४७ हजार २५६ वीज ग्राहकांकडे १६९५ कोटी १६ लाख रुपये वीज बिल थकीत आहे. ग्राहकाने महिनाभर वीज वापरल्यानंतर त्यास बिल देण्यात येते. ते वीज बिल भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात येते. मात्र काही ग्राहक हे वीज बिल भरत नसल्याने महावितरण कंपनीला आर्थिक आघाडीवर तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे महावितरण कंपनीने नाशिक शहर, जिल्ह्यातील आठ विभाग स्तरावर अधिकारी, कर्मचाऱ्यांची समिती स्थापन करून गुरुवारपासून ३० नोव्हेंबरपर्यंत थकीत वीज बिल वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. थकीत बिल न भरल्यास लागलीच वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे थकीत वीज बिल ग्राहकांनी महावितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.