निर्मलग्राम योजनेतील पिछाडी भरून काढा : विजयश्री चुंबळे फटकारले :आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण
By Admin | Published: December 12, 2014 01:56 AM2014-12-12T01:56:22+5:302014-12-12T01:56:46+5:30
निर्मलग्राम योजनेतील पिछाडी भरून काढा : विजयश्री चुंबळे फटकारले :आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण
नाशिक : निर्मलग्राम योजनेत रायगड आणि सातारा हे जिल्हे पुढे असून, आपला जिल्हा पिछाडीवर असून गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांवर जबाबदारी टाकून जास्तीत जास्त गावे निर्मलग्राम करावीत, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी केले.
येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार व निर्मलग्राम पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती शोभा डोखळे, उषा बच्छाव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदिंसह जिल्हा परिषद सदस्य व विविध ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य उपस्थित होते. पुरस्कारांचे वितरण अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी चुंबळे यांनी मनोगत व्यक्त केले. निर्मलग्राम अभियानात रायगड व सातारा जिल्हा अग्रेसर असून, नाशिक जिल्हा पिछाडीवर पडला आहे. संपूर्ण जिल्हाच निर्मलग्राम झाला पाहिजे, त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामेसवकांवर जबाबदारी टाकून त्यांना उद्दिष्ट पूर्ण करण्यास सांगावे. शौचालय उभारणीसाठीच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून, त्याचाही या निर्मलग्राम अभियानाला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतींनी आपले उत्पन्न वाढविल्यास त्यांना शौचालय उभारणीसाठी जादा तरतूद करता येईल. निर्मलग्राम अभियान राबविताना ग्रामसेवकांवर मोठी जबाबदारी असून, ग्रामसेवकाने जनता आणि शासन यांच्यामध्ये दुव्याचे काम करावे. सभापती उषा बच्छाव व शोभा डोखळे यांनीही ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना, ग्रामसेवकांनी माझे गाव ही आत्मयिता ठेवून काम केल्यास गावाचा विकास होईल. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की, शहरीकरणाचा वेग वाढला असून, ग्रामसेवकांच्या कामात बदल होत आहे. ग्रामपंचायत कार्यालय हे मंदिर असून, ग्रामसेवकांनी हे ग्राममंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी झटत राहिले पाहिजे. यावेळी जि. प. सदस्य गोरख बोडके, पंचायत समिती सभापती धर्मराज पवार, मंदाकिनी निकम, गोपाळ लहांगे, उपसभापती शांताराम मुळाणे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कैलास वाकचौरे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
इन्फो..
यांना मिळाला आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
भरत पगार (बागलाण),मल्लिकार्जुन डांगरे (चांदवड), सिद्धार्थ आगळे (दिंडोरी),वैशाली पवार(देवळा), हरिभाऊ सूर्यवंशी (इगतपुरी), विजय देवरे (कळवण), विलास पाटील (मालेगाव), प्रमोद खैरनार (निफाड), बबन गोरे (नाशिक), हनुमंत दराडे (नांदगाव), मोतीराम चौधरी (पेठ), श्रीमती मंजुळा वाघेरे (सुरगाणा),जयवंत साखरे(सिन्नर),श्रीमती रूपाली पाटील(त्र्यंबकेश्वर),प्रमोद बोडके(येवला).