प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी स्फुक्टोचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 06:37 PM2018-09-29T18:37:50+5:302018-09-29T18:40:37+5:30
शिक्षणमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या काही प्रतिनिधींनी शनिवारी (दि. २९) नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना प्राध्यापकांच्या राज्यातील १२ हजार रिक्त जागा भरण्यासह अन्य मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत प्राध्यापकांच्या मागण्यांविषयी मध्यस्थी करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. नंदू पवार यांनी सांगितले.
नाशिक : शिक्षणमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या काही प्रतिनिधींनी शनिवारी (दि. २९) नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना प्राध्यापकांच्या राज्यातील १२ हजार रिक्त जागा भरण्यासह अन्य मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत प्राध्यापकांच्या मागण्यांविषयी मध्यस्थी करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. नंदू पवार यांनी सांगितले.
प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघातर्फे सुरू असलेले कामबंद आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच असून, वारंवार आंदोलने करूनही सरकार प्राध्यापकांना दाद देत नसल्याने यावेळी मागण्या मान्य करून त्याविषयी लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय अध्यापक संघटनेने घेतला आहे. याचदरम्यान, ओझर येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांची नाशिक जिल्हा स्फूक्टोचे अध्यक्ष डॉ. सतीश ठाकरे, प्रा. विजय काकुळते, सिनेट सदस्य डॉ. नंदू पवार, प्रा. जे. एस. पाटील, डॉ. राजू सांगळे आदी प्रतिनिधींनी भेट घेऊन प्राध्यापकांच्या मागण्यांचे निवेदन दिले. प्राध्यापक महासंघातर्फे मागील दोन महिन्यांत पाच वेळा राज्यस्तरीय आंदोलने करून मागण्या प्रलंबितच आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभरातील २५ हजारांहून अधिक प्राध्यापक पाच दिवसांपासून कामबंद आंदोलन करीत आहे.