नवीन विस्तारित उड्डाणपुलावरील खड्डे बुजविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:17 AM2021-08-23T04:17:51+5:302021-08-23T04:17:51+5:30
पहिल्याच पावसामुळे उड्डाणपुलावर असलेल्या रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने कामाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित विभागाने उड्डाणपुलावर तात्पुरती ...
पहिल्याच पावसामुळे उड्डाणपुलावर असलेल्या रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने कामाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
संबंधित विभागाने उड्डाणपुलावर तात्पुरती मलमपट्टी करून रस्ते बुजविले असले तरी आगामी कालावधीत पावसाने पुन्हा हजेरी लावल्यास रस्त्यावर खड्डे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी खासदार हेमंत गोडसे यांनी या पुलाचे उद्घाटन करून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला आहे.
उड्डाणपुलावरून वाहतूक सुरळीत चालू असली तरी ज्या ठिकाणी पुलावर जाण्यासाठी रॅम्प तयार केले आहे त्या रॅम्पवरचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे, तर मुख्य पुलाखालील रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहनधारकांना जोड रस्त्याने आडगावकडे मार्गक्रमण करावे लागत आहे. पुलाखाली असलेल्या रस्त्यावर माती, तसेच दगड पडलेले असून, या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. परिणामी जोड रस्त्याने वाहनांची वर्दळ सुरू असल्याने समांतर रस्त्याने वाहने नेताना वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे.
इन्फो बॉक्स
उड्डाण पुलाखालील रस्ता खुला
पावसामुळे उड्डाणपुलाखाली दुचाकी घसरत असल्याच्या घटना घडत असल्याने पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून उड्डाण पुलाखालचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करून वाहतूक समांतर रस्त्याने वळविली होती. मात्र, रविवारी पावसाने उघडीप दिल्याने उड्डाण पुलाखालील वाहतूक पुन्हा सुरू केल्याने द्वारका, तपोवन क्रॉसिंग, संतोष टी पॉईंट, तसेच स्वामी नारायण चौकीसमोरील पुलाखालून वाहतूक सुरू होती.