पिंपरी हवेली येथील माती बंधाऱ्याचा भराव गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:19 AM2021-09-10T04:19:50+5:302021-09-10T04:19:50+5:30
न्यायडोंगरी : गेल्या चार दिवसांपासून दिवसभर लपंडाव खेळणाऱ्या पावसाने रात्री मात्र न्यायडोंगरीसह परिसरातील हिंगणे, पिंपरी हवेली, परधाडी, रणखेडा, ...
न्यायडोंगरी : गेल्या चार दिवसांपासून दिवसभर लपंडाव खेळणाऱ्या पावसाने रात्री मात्र न्यायडोंगरीसह परिसरातील हिंगणे, पिंपरी हवेली, परधाडी, रणखेडा, बिरोळा, पिंपरखेड या गावांना गाठलेच. सायं.६ वा.च्या सुमारास न्यायडोंगरी परिसरात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने काही क्षण का होईना धडकी भरविली. चार दिवसांपासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. मात्र रात्री पावसाचा जोर वाढून पावसाने झोडपून काढले. यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. तोंडी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकरी राजा चिंतेत झाला आहे. शासनाने वेळीच पंचनामे करून तात्काळ मदत करावी, अशी मागणी सर्वच स्तरावरून केली जात आहे, तर विविध ठिकाणी विविध नुकसानीच्या घटना समोर येत आहेत.
पिंपरी हवेली, नायडोंगरी, रणखेडा या गावांमध्ये रात्रीच्या पावसाने लोकांच्या घरात पाणी घुसले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रणखेडा, पिंपरी हवेली गावाला येणारा मार्गही बंद झाला असून, दळणवळण ठप्प झाले असून, गाव संपर्कहीन होण्याचा धोका आहे. परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने मदतकार्य राबविण्याची गरज आहे.
------------
न्यायडोंगरी गावावर टांगती तलवार
डोंगर परिसरात अतिवृष्टी झाल्याने प्रमुख तिन्ही नदीवर वनविभागात बांधण्यात आलेले १५ ते २० माती बंधाऱ्यांपैकी सात ते आठ मोठे बंधारे फुटण्याच्या स्थितीत आहेत. जर यापुढेही पावसाची अशीच स्थिती राहिली तर पिंपरी हवेली व न्यायडोंगरी गावाची खूप मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होऊ शकते. कारण उगमापासून सर्व बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत व तिन्ही नदीवरील अनुक्रमे मातीचे मोठे बंधारे बेहडा, परधुने, जांभूळपाट, खारपाणी, तांबोळा अतिवृष्टी झाल्याने जलद पाणी प्रवाहामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा भराव खचला गेलेला आहे.
---------------
रणखेडा गावाचा मुख्य रस्ता गेला वाहून
रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गावात येणाऱ्या रस्त्याचे भूस्खलन झालेले आहे. त्यामुळे गावाचा मुख्य रस्ता वाहून गेल्याने दळणवळण पूर्णपणे बंद झाले आहे. पावसाचे वाहते पाणी ६ ते ७ फुटापर्यंत साचल्याने लोकांच्या घरात पाणी घुसल्याने रणखेडा गावाला गैरसोयीशी सामना करावा लागत आहे. रणखेडा येथील नागरिकांकडून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
-------
खंडेराव मंदिर परिसराकडून गावामध्ये येणाऱ्या वाहत्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक, संभाजी चौक, भवानी चौक, चांदणी चौक, एकलव्यनगर, बाजारपेठ परिसर जलमय, इंदूबाई रघुनाथ आहेर यांच्या घरात पाण्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान, गोपाळ महानोर व राम नारायण शर्मा यांच्यासह अनेक घरांची परझड, बाजारपेठेतील अनेक दुकानात पाणी घुसले.
(०९ न्यायडोंगरी,१,२)
090921\09nsk_23_09092021_13.jpg
०९ न्यायडोंगरी १