कुंभनरीतील चित्रीकरणे पुन्हा मायानगरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:31 AM2020-12-16T04:31:21+5:302020-12-16T04:31:21+5:30
नाशिक: मुंबई तसेच अन्य शहरांमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू असताना सहा महिन्यांपासून बंद असलेल्या चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण नाशिक परिसरात ...
नाशिक: मुंबई तसेच अन्य शहरांमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू असताना सहा महिन्यांपासून बंद असलेल्या चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण नाशिक परिसरात करण्याला प्राधान्य देणारे निर्माते आता पुन्हा मुंबई आणि कोल्हापूरला परतल्याचे दिसते. तीन महिन्यांपूर्वी डझनभर चित्रीकरण सुरू असलेल्या नाशिकमध्ये सध्या एकाच वेबसीरिजचे चित्रीकरण सुरू आहे.
मुंबई शहरापासून जवळ असलेले नाशिक हे शहर चित्रीकरणासाठी उत्तम पर्याय असल्याने निर्मात्यांना नाशिककडे आकर्षित करण्यासाठी नाशिकमधील कलावंतांनी प्रयत्न चालविले होते. यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनीदेखील सकारात्मकता दर्शविल्याने नाशिकमध्ये चित्रनगरीचे स्वप्न साकार होण्याची चर्चा सुरू झाली होती. याचेवेळी अनेक मालिकांचे चित्रीकरण नाशिक शहर आणि लगतच्या परिसरात सुरू झाले. हिंदी, मराठी चित्रपट तसेच वेबसीरिज निर्मात्यांनादेखील नाशिकची भुरळ पडली आणि मुंबईतील कलावंत नाशिकमध्ये धडकले.
जवळपास डझनभर चित्रीकरणे नाशिक परिरसरात सुरू झाल्याने नाशिकच्या निसर्ग सौंदर्यांविषयी चित्रपट निर्मात्यांनी आवर्जून माहिती घेत नाशिकला भेट देऊन लोकशनची पाहणीदेखील केली होती. भगूर, देवळाली, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर, गंगापूर, सावरगाव, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी प्रत्यक्षात मालिका आणि चित्रपटांचे शुटिंग करण्यात आले. कोरोनात पुणे, मुंबईत सेट उभारून शुटिंग करणे शक्य नसल्याने नाशिकच्या नैसर्गिक लोकेशनला निर्मात्यांनी प्राधान्य दिले होते; परंतु आता चित्रीकरणाची लाट ओसरल्याचे दिसत आहे.
--इन्फेा--
आमिर खानचाही नाशिक दौरा
मागील महिन्यात मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान यानेदेखील नाशिकमधील काही लोकेशनला भेट दिली होती. नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आमिरने स्थळांची पाहाणी केल्याचे बोलले जात आहे. एका चित्रपटासाठी आमिर खान नाशिकला प्राधान्य देणार असल्याची चर्चा असतानाच त्याने घाईघाईत दिलेल्या भेटीने नाशिककरांच्या आशादेखील पल्लवित झालेल्या आहेत.
==कोट---
संघटित व्यावसायिक प्रयत्नांची गरज
नाशिकला अजूनही शुटिंगसाठी प्राधान्य दिले जात आहे; मात्र चित्रीकरणासंदर्भात लागणाऱ्या व्यावसायिक दर्जाच्या तांत्रिक सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध होण्याची गरज आहे. नाशिक-त्र्यंबक-इगतपुरी हा शुटिंग झोन डेव्हलप होण्याची तसेच सवलती बहाल करण्याच्या प्रशासकीय निर्णयांचीदेखील गरज आहे. यासाठी नाशिकरांना तांत्रिक, प्रशासकीय वातावरण निर्माण करावे लागेल. आजही नाशिकला चित्रीकरण करण्याला निर्माते तयार आहेत. ते वाढविण्यासाठी नाशिकरांना प्रयत्न करावे लागतील.
-चिन्मय उदगीरकर, अभिनेता