करवाढीचा अंतिम निर्णय महासभेतच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:03 AM2017-08-18T01:03:11+5:302017-08-18T01:04:22+5:30
नाशिक : नाशिककरांना दत्तक घेतल्याची भावनिक घोषणा करणाºया मुख्यमंत्र्यांना प्रतिसाद दिल्यानंतर भाजपाने बहुमत मिळवले खरे, परंतु नाशिककरांवर भरघोस करवाढ लादण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. आयुक्तांनी सादर केलेली दरवाढ जशीच्या तशी स्वीकारल्यानंतर भाजपावर चौफेर भडिमार झाला असून, त्यापार्श्वभूमीवर भाजपाने बॅकफुटवर जात करवाढीचा फैसला महासभेतच होईल, असे सांगण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर करवाढ ही भाजपाची भूमिकाच नसल्याचे गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी म्हटले आहे. गेल्या २२ वर्षांत शहरात घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ झाली नसल्याचा दावा करीत बुधवारी (दि.१६) स्थायी समितीने आयुक्तांची करवाढीची शिफारस जशीच्या तशी मान्य केली. घरगुती, बिगर घरगुती आणि व्यावसायिक अशा सर्वच प्रकारांत दरवाढ करण्यात आली. त्यानुसार घरपट्टीत सरसकट १८ टक्के वाढ करण्यात आली असून, पाणीपट्टीत चाळीस टक्के वाढ करण्यात आली आहे. सामान्यत: आयुक्तांनी प्रस्ताव दिल्यानंतर त्यात स्थायी समिती कपात करते, परंतु येथे मात्र भाजपाने या करवाढीचे समर्थन तर केलेच, परंतु शशिकांत जाधव यांनी तर करवाढ करावी ही नागरिकांचीच मागणी असल्याचा दावा केला होता. नाशिककरांना भाजपाने दणका दिल्यानंतर नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. नाशिक शहरात सध्या महापालिकेच्या वतीने मिळकतींचे सर्वेक्षण सुरू असून, साठ हजार बेकायदेशीर बांधकामे आढळली आहेत. अशा स्थितीत इतकी घाई कशासाठी असा प्रश्न केला जात आहे. विशेषत: कोणत्याही करवाढीसाठी २० फेब्रुवारीच्या आत निर्णय होणे बंधनकारक आहे आणि आज मितीला त्यासाठी तब्बल सहा महिने अवकाश आहे.