एका शववाहिकेतून तीन मृतदेहांचा अंतिम प्रवास
By अझहर शेख | Published: April 22, 2021 02:07 AM2021-04-22T02:07:10+5:302021-04-22T02:08:54+5:30
जुने नाशिकमधील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. सुरुवातीला रुग्णालयाच्या द्वारावर रुग्णवाहिकांची रांग होती, तर दुपारनंतर शववाहिकांच्या फेऱ्या रुग्णालय ते अमरधाम अशा सुरू झाल्या. दोन ते तीन रुग्णवाहिकांमधून मृतदेहांचा प्रवास सुरू झाला. एका रुग्णवाहिकेत तीन मृतदेह ठेवून वाहतूक करण्याचा बाका प्रसंग यावेळी मनपा प्रशासनावर ओढावला.
नाशिक : जुने नाशिकमधील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. सुरुवातीला रुग्णालयाच्या द्वारावर रुग्णवाहिकांची रांग होती, तर दुपारनंतर शववाहिकांच्या फेऱ्या रुग्णालय ते अमरधाम अशा सुरू झाल्या. दोन ते तीन रुग्णवाहिकांमधून मृतदेहांचा प्रवास सुरू झाला. एका रुग्णवाहिकेत तीन मृतदेह ठेवून वाहतूक करण्याचा बाका प्रसंग यावेळी मनपा प्रशासनावर ओढावला.
रुग्णवाहिकाही अपुऱ्या
दुर्घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाइकांनी तत्काळ रुग्णांना अन्यत्र हलविण्यास सुरुवात केली. यासाठी काही रुग्णांना शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकल्या नाही. मनपाच्या वतीने चार रुग्णांना बिटको रुग्णालयात तर एका रुग्णाला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
मन सुन्न करणारा टाहो
दोन ते तीन रुग्णवाहिकांमधून दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह वाहून नेताना त्यांच्या नातेवाइकांकडून फोडण्यात येणारा टाहो हा मन सुन्न करणारा होता. एकापाठोपाठ एक रुग्णवाहिका रुग्णालयात दाखल होत होती. मृतांची ओळख पटवून त्यात मृतदेह ठेवण्यात येत होते.
गोरगरीब कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या या भीषण दुर्घटनेत निष्पाप २२ जिवांचे प्राण गेले. ऑक्सिजनच्या टाकीला गळती लागली. रुग्णालयात खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा वेगाने कमी होऊ लागला. ऑक्सिजन पुरवठ्याचा पुरेसा दाब मिळू न शकल्यामुळे रुग्णालयातील कोविड वॉर्डात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा श्वास गुदमरायला लागला. त्यांची तडफड बघून नातेवाइकांचा जिवाची घालमेल सुरू झाली.
n नातेवाइकांनी आपल्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्यांचे तळपाय, तळहात चोळण्यास सुरुवात केली तर काहींनी त्यांची छाती चोळली तर अनेकांची छाती दाबून (सीपीआर) श्वास थांबणार नाही, याचा प्रयत्नही केला; मात्र अनेकांचे हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आणि काळाने कोणाची आजी, कोणाचा पती, तर कोणाचा भाऊ-बहीण त्यांच्यापासून कायमचे हिरावून नेले. यावेळी नातेवाइकांनी फोडलेला टाहो अन् आक्रोश रुग्णालयाच्या भिंतींसह शासकीय, प्रशासकीय यंत्रणेलाही हादरवून सोडणारा होता.