बाजार समित्यांची अंतिम यादी ३ एप्रिल रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:52 PM2018-03-29T14:52:12+5:302018-03-29T14:52:12+5:30
सहकार प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत नवीन कायदा केला असून, यापुढे ज्या बाजार समित्यांची मुदत संपुष्टात येईल त्यांची निवडणूक नवीन कायद्यानुसार घेण्याचे ठरविण्यात आले आहे. बाजार समिती कार्यक्षेत्रातील १० गुंठे जमीन नावावर असलेल्या प्रत्येक शेतक-याला नवीन कायद्यानुसार
नाशिक : नवीन सहकार कायद्यानुसार होऊ घातलेल्या जिल्ह्यातील नामपूर व सटाणा बाजार समित्यांची अंतिम मतदार यादी येत्या ३ एप्रिल रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात असून, तसे झाल्यास मे महिन्याच्या अखेरीस या दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक होण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी राखीव गटातून उमेदवारी करणाऱ्यांना नामांकन दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले असले तरी, समाजकल्याण खात्याने जोपर्यंत या निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्याचा पुरावा दाखल होत नाही तोपर्यंत इच्छुकांची जात वैधता न करण्याचा निर्णय घेतल्याने वैधता मिळविण्यासाठी ऐनवेळी उमेदवारांची धावाधाव होणार आहे.
सहकार प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत नवीन कायदा केला असून, यापुढे ज्या बाजार समित्यांची मुदत संपुष्टात येईल त्यांची निवडणूक नवीन कायद्यानुसार घेण्याचे ठरविण्यात आले आहे. बाजार समिती कार्यक्षेत्रातील १० गुंठे जमीन नावावर असलेल्या प्रत्येक शेतक-याला नवीन कायद्यानुसार बाजार समितीचे मतदार ठरविण्यात आल्याने नामपूर व सटाणा या दोन बाजार समितींच्या अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सूत्रांच्या मते मतदार याद्या तयार झाल्या असून, त्यावर अखेरचा हात फिरविला जात आहे. येत्या ३ एप्रिल रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तयारीही पूर्ण झाली आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर साधारणत: २० दिवसांच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जातो व या निवडणूक कार्यक्रमासाठी ३५ दिवसांची मुदत असते. त्यामुळे एप्रिल महिन्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यास साधारणत: मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. तशी घोषणा सहकार प्राधिकरण करणार आहे. त्यामुळे इच्छुकांचे अंतिम मतदार यादीकडे लक्ष लागले आहे.