खंडोबा महाराज यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 10:57 PM2019-12-08T22:57:19+5:302019-12-08T22:59:31+5:30
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील ग्रामदैवत खंडोबा महाराजांचा यात्रोत्सव बुधवारपासून (दि. ११) सुरू होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा समितीने दिली आहे. यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील ग्रामदैवत खंडोबा महाराजांचा यात्रोत्सव बुधवारपासून (दि. ११) सुरू होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा समितीने दिली आहे. यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
दत्त जयंतीपासून सुरू होणारा हा यात्रोत्सव आठवडाभर चालतो. आवर्तन पद्धतीने साजरा होणारा हा यात्रोत्सव साजरा करण्याचा मान पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव या गावांना मिळतो. यावर्षी हा मान पाथरे बुद्रुककरांना मिळाला आहे.
खंडोबा महाराज मंदिर, दत्त मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. येथील मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात येत आहे. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी बुधवारी रात्री आठ वाजता गावातून छबिण्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे. गावातील बुरूजाच्या वाड्यासमोर धनगर बांधवांच्या वतीने रथाची मिरवणूक काढून डफांच्या तालावर नृत्य केले जाते.
यावेळी खंडोबा महाराजांच्या पादुका आणि मुकुट, तकतराव म्हणजेच देवाचा गाडा यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. गुरुवारी सकाळी खंडोबा महाराज पादुका पालखी सोहळा, तकतराव व कावड मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक कावडधारकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. शनिवारी कुस्त्यांची दंगल होणार आहे. यात्रेसाठी ग्रामस्थांनी दिली देणगीयात्रा नियोजनासाठी नुकतीच ग्रामस्थांची बैठक पार पडली. समितीच्या अध्यक्षपदी अरुण नरोडे, उपाध्यक्ष बाळासाहेब चिने, सरपंच शरद नरोडे, उपसरपंच सविता थोरात व इतर सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रत्येक कुटुंबाकडून ४०० रुपये वर्गणी घेण्याचे ठरले. यात्रा काळात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित ठेवण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष नरोडे यांच्यासह वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी केले आहे.