भगूर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:57 PM2018-11-17T22:57:03+5:302018-11-18T00:19:13+5:30
भगूर शहरातील विजयनगर चौफुलीपासून देवळाली छावणी नाका दोनपर्यंतच्या नवीन रेल्वे गेटपर्यंत होणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलामुळे सिन्नर, नाशिक, इगतपुरी या तीन तालुक्यांतील २५ ते ३० गावे व वाड्या-वस्तींच्या दळणवळणाची सोय होऊन संपर्कसाठी जवळ येणार आहे.
विलास भालेराव । भगूर : शहरातील विजयनगर चौफुलीपासून देवळाली छावणी नाका दोनपर्यंतच्या नवीन रेल्वे गेटपर्यंत होणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलामुळे सिन्नर, नाशिक, इगतपुरी या तीन तालुक्यांतील २५ ते ३० गावे व वाड्या-वस्तींच्या दळणवळणाची सोय होऊन संपर्कसाठी जवळ येणार आहे.
भगूरमधून इतर शहरांच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी जुने रेल्वेगेट व मोरीपूल होता यामुळे भगूर व परिसरात अनेक रस्ते अडचणीचे ठरत होते. दळणवळण यंत्रणा व लोकसंख्या वाढत गेली त्यानुसार जुने रेल्वेगेट बंद होऊन नूतन विद्यामंदिर शाळेच्या बाजूला नवीन रेल्वेगेट तयार करण्यात आले तेथूनच भगूरसह परिसरातील तीन तालुक्यांतील २५ ते ३० गावांतील दळणवळणाचा मार्ग काहिसा सुकर झाला. गेल्या १५ ते २० वर्षांत भगूरला लागून असलेला विजयनगर परिसर विकसित होवून या ठिकाणी घरकुले, सोसायट्या उभ्या राहिल्या, विजयनगरची लोकसंख्या वाढल्याने वाहनांच्या भगूरच्या नवीन रेल्वे गेटसमोर रांगा लागू लागल्या. रहदारीसाठी रस्ता अपुरा पडू लागल्याने या नवीन रेल्वे गेटवर उड्डाणपूल तयार करून दळणवळणाची समस्या सोडवावी, अशी मागणी होऊ लागली वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी विशेष प्रयत्न करून भगूर रेल्वे गेटवर उड्डाणपूल करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आजमितीला पूल पूर्णत्वास येत आहे.
सदर पुलाच्या कामाची निविदा १८ कोटी २७ लाख रुपयांची आहे, परंतु मुख्य पूल बांधणीसाठी केंद्रीयमार्ग विभागाकडून १५ कोटी मंजूर झाले असून, पुलाची लांबी ४५० मीटर असून, रुंदी १२ मीटर आहे. यामध्ये एक अंडरपास रस्ता असून एक रस्ता विजयनगर परिसरासाठी राहणार आहे. इतर रस्त्यासाठी बांधकाम विभागाकडून १५ कोटी ५१ लाख ५८ हजार ५३२ मंजूर करण्यात आले आहेत. त्याचेही काम सुरू झाले आहे. सध्या पुलाच्या कामाची मुदत संपून साधारण २० महिने झाले आहे आणि अजून पूर्णत्वास जाण्यास नऊ महिने लागणार आहे. शेवटच्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम, केंद्रीय महामार्ग आणि भारतीय रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अभियंता यांच्या संयुक्त देखरेखीखाली मुख्य पुलाचे अंतिम फाउंडेशन पूर्ण केले जाणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूल पूर्णत्वास येणार आहे.
दळणवळणाची होणार सोय
रेल्वे उड्डाणपूल तयार झाल्यानंतर खºया अर्थाने भगूर परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. रस्त्याच्या अडचणीमुळे येथील व्यवसाय ओस पडले होते. परिणामी परिसरातील नागरिक देवळाली कॅम्प, नाशिकरोड, नाशिक शहर येथे खरेदी करण्यासाठी जात होते. भगूर परिसरातील अनेक व्यावसायिकांनी देवळाली कॅम्प, नाशिकरोड येथे राहण्यासाठी गेले त्यांनी तेथेच व्यवसाय थाटला आहे. आता नवीन पुलामुळे घोटी-सिन्नर रस्ता अतिशय जवळचा मार्ग होणार आहे. त्यामुळे भगूरच्या विकास, व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून, मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी नाशिककडे जाण्याची गरज भासणार नाही. उड्डाणपुलाच्या सोयीमुळे सिन्नरमार्गे जाणारा भाजीपाला भगूरच्या बाजारात येईल. नाशिक, नाशिकरोड येथील नागरिकांना सिन्नर, इगतपुरी तालुक्यांत जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरणार आहे.