कांदा लागवड अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 10:41 PM2020-01-19T22:41:45+5:302020-01-20T00:14:57+5:30
रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवड अंतिम टप्प्यात असून, बळीराजाची लगबग सुरू आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाला खरिपाचे उत्पन्न हाती आले नाही. पर्यायाने पैसा हाती नाही त्यातच मजुरांची टंचाई, वाढलेला मजुरीचा दर, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, भारनियमन, मशागतीसाठी ट्रॅक्टरची महागडी मजुरी अशा अनेक समस्यांना तोंड देत रब्बीतील उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात मग्न असून, लागवड अंतिम टप्प्यात आहे.
पाटणे : परिसरात रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवड अंतिम टप्प्यात असून, बळीराजाची लगबग सुरू आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाला खरिपाचे उत्पन्न हाती आले नाही. पर्यायाने पैसा हाती नाही त्यातच मजुरांची टंचाई, वाढलेला मजुरीचा दर, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, भारनियमन, मशागतीसाठी ट्रॅक्टरची महागडी मजुरी अशा अनेक समस्यांना तोंड देत रब्बीतील उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात मग्न असून, लागवड अंतिम टप्प्यात आहे.
मागील वर्षी अल्पपावसामुळे रब्बीतील उन्हाळ कांद्याची लागवड १५ जानेवारीच्या आत झाली होती. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे जवळ जवळ दीड महिना उशिरा लागवडीला सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे नष्ट झाली होती. परिणामी शेतकºयांना पुन्हा बियाणे टाकून रोपे तयार करावी लागली. त्याची लागवड जानेवारी महिन्यात सध्या चालू आहे. उन्हाळ कांदासाठी एकरी खर्च सात ते आठ हजार रुपये येत असून, मजुरी, पलटी नांगर अठराशे ते दोन हजार रुपये एकर, रोटावेटर मारणे सोळाशे ते अठराशे रुपये एकरी, सºया पाडून वाफे तयार करणे दोन हजार रुपये, शेणखत दोन ट्रॉली दहा हजार रुपये, रासायनिक खते तीन ते चार हजार रुपये असा खर्च असून, एकूण २० ते २५ हजार रुपये खर्च फक्त लागवडीसाठी होतो. लागवड, आंतरमशागत, रासायनिक खते, कीटकनाशके फवारणी, पाण्याचे व्यवस्थापन, कांदे काढणे असा एकूण ५० हजारांहून जास्त खर्च करावा लागतो. उत्पन्न दीडशे ते दोनशे क्विंटल प्रतिएकरी येऊ शकते. अशाही परिस्थितीत एवढा खर्च करून दररोज बदलणाºया लहरी हवामानाचा फटका रब्बीतील पिकांवर होईल याची धास्ती शेतकºयांना लागली आहे. पुढील दीड दोन महिने थंडी राहिली तर कांद्याचे उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल.
कांदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यतां
यावर्षी अतिवृष्टीमुळे सर्वत्र मुबलक प्रमाणात पाणी आहे याचाही फायदा उत्पन्नवाढीसाठी होईल; परंतु भाव मिळेल याची शाश्वती नाही. एकूणच उन्हाळ कांद्यावरील लागवडीसाठी हजारो रुपये खर्च करून भविष्यात भाव मिळेल की नाही याची शाश्वती नाही. गेल्या काही दिवसांपासून कांदा भावात वाढ झाल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी कांदा लागवडीस पसंती देत असल्याने यावर्षी कांद्याचे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.