अखेर अधिकारी नियुक्त
By admin | Published: August 14, 2014 09:55 PM2014-08-14T21:55:58+5:302014-08-15T00:32:43+5:30
अखेर अधिकारी नियुक्त
सिडको : सिडको भागातील वाढते अतिक्रमण, प्रकल्पग्रस्तांच्या जागेचा मोबदला याबरोबरच सहावी योजना हस्तांतरण करण्यासाठी सिडको प्रशासकीय कार्यालयाने एका स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.
सिडकोने गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून येथील शेतकऱ्यांच्या जमिनी आर्थिक तडजोड करीत ताब्यात घेतल्या व त्या जागेवर कमी व उच्च उत्पन्न गट यांच्यासाठी घरे बांधली. सर्वसामान्यांनाही हक्काचे निवासस्थान असावे, हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवत सिडको प्रशासनाने एक ते सहा योजनांची टप्प्याटप्प्याने उभारणी केली. आजमितीला सहा योजनांपैकी एक ते पाच योजना या सिडकोने महापालिकेकडे हस्तांतरण केल्या आहेत. परंतु पाचही योजनांकडील बांधकाम परवानगी, घर हस्तांतरण ना हरकत दाखला मिळणे आदिंचे अधिकार सिडकोने त्यांच्याकडेच राखून ठेवले आहेत. सध्या सिडकोच्या मूळ घराच्या मागील बाजूस तसेच मूळ घराच्या वर बांधकाम करण्यास सिडकोकडून परवानगी दिली जाते. आज सिडकोच्याच मूळ घरावर व आजूबाजूच्या जागेवर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. अर्थात नागरिकांनी अतिक्रमण केले असले तरी ते काढण्याची जबाबदारीही सिडको प्रशासनाचीच आहे; परंतु सिडको प्रशासनाकडे स्वतंत्र असे अतिक्रमण पथक असून नसल्यासारखेच आहे. यामुळे संपूर्ण सिडकोच अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन सिडको वसाहत स्थापन झाली. परंतु प्रकल्पग्रस्तांना अद्याप त्यांच्या जागेचा पूर्ण मोबदला मिळालेला नाही. यातील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. हे प्रश्नदेखील सुटणे गरजेचे आहे.
सदर प्रश्न मार्गी लागावे यासाठी सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर (नवीन शहरे) यांनी नाशिकच्या सिडको प्रशासकीय कार्यालयात गेल्या सोमवारपासून संजय निपाणी या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. (वार्ताहर)