अखेर देवीदास पिंगळे यांना जामीन
By admin | Published: April 6, 2017 01:09 AM2017-04-06T01:09:24+5:302017-04-06T01:09:37+5:30
नाशिक : बाजार समितीतील १२८ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता व बोनसमधील ५८ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी सभापती देवीदास पिंगळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी जामीन मंजूर केला़
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीतील १२८ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता व बोनसमधील ५८ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी २५ डिसेंबरपासून न्यायालयीन कोठडीत (नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह) व सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी बुधवारी (दि़ ५) सशर्त जामीन मंजूर केला़ त्यामध्ये चार महिने नाशिक शहर बंदी व सुनावणी पूर्ण होईपर्यंत बाजार समितीच्या कारभारात हस्तक्षेप न करण्याच्या अटींचा समावेश आहे़
मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी या जामिनावर सुनावणी झाली़ पिंगळे यांचे वकील अॅड़ अनिकेत निकम यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, पिंगळे हे सराईत गुन्हेगार नसून राजकीय द्वेषापोटी त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले आहे़ या गुन्ह्णात दीड हजार पानी दोषारोपपत्रदेखील दाखल करण्यात आल्याने तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही़ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्णात आरोपीला इतके दिवस कारागृहात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला़ तर सरकारी वकिलांनी पिंगळे यांच्या जामिनास विरोध करून साक्षीदार व कारवाईस दबाव निर्माण होण्याचा युक्तिवाद केला़
न्या. मृदुला भाटकर यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून पिंगळे
यांना सशर्त जामीन मंजूर केला़ त्यामध्ये ४० हजार रुपयांचे जामीनदार, चार महिने नाशिक शहर बंदी व खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत बाजार समितीच्या कारभारात हस्तक्षेप न करण्याच्या अटींचा समावेश आहे़
यापूर्वी जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना धमकावल्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेले अदखलपात्र गुन्हे, अपहाराची मोठी रक्कम, जिल्हा रुग्णालयाने वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचा अहवाल तसेच एसीबीकडील पुरावे या आधारावर पिंगळे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता़
दरम्यान, देवीदास पिंगळे हे २० मार्चपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत़ उच्च न्यायालयाकडून जामिनाची प्रत मिळताच त्यांची कारागृहातून सुटका केली जाणार आहे़ (प्रतिनिधी) काय आहे प्रकरण़़़
च्नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी मिळणारे सानुग्रह अनुदान व वेतनातील फरकाची रक्कम सेल्फ बेअरर चेकवर बळजबरीने सह्या घेऊन पेठ नाक्यावरील एनडीसीसी बँकेतून काढून ती एका पदाधिकाऱ्याकडे पोहोचवली जाणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती़ त्यानुसार २५ आॅक्टोबर २०१६ रोजी सापळा रचून सायंकाळी समितीचे कर्मचारी तथा संचालकाचे सचिव विजय निकम, अरविंद जैन (लेखापाल), दिगंबर चिखले (लिपिक) हे जात असलेल्या स्विफ्ट डिझायर (एमएच १५, सीएम २१८०) कारमधून ५७ लाख ७३ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त केली़ या तिघांवरही म्हसरूळ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती़ या तिघांना प्रथम पोलीस व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती़