अखेर महापालिकेत बाप्पा विराजमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:29 AM2018-09-14T00:29:45+5:302018-09-14T00:30:16+5:30
नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुजू होताच देवदेवतांच्या मूर्ती हटविण्याचे दिलेले आदेश, त्यानंतर गणेश उत्सवावरील नियमावलीचे निर्बंध अशा वातावरणामुळे मनपा कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव यंदा अनिश्चित असताना आयुक्तांनी त्याला परवानगी तर दिलीच, परंतु मेनरोड आणि राजीव गांधी मुख्यालयात दोन्ही ठिकाणी हजेरी लावून पूजा विधीही केल्याने साºयांनाच सुखद धक्का बसला.
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुजू होताच देवदेवतांच्या मूर्ती हटविण्याचे दिलेले आदेश, त्यानंतर गणेश उत्सवावरील नियमावलीचे निर्बंध अशा वातावरणामुळे मनपा कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव यंदा अनिश्चित असताना आयुक्तांनी त्याला परवानगी तर दिलीच, परंतु मेनरोड आणि राजीव गांधी मुख्यालयात दोन्ही ठिकाणी हजेरी लावून पूजा विधीही केल्याने साºयांनाच सुखद धक्का बसला.
महापालिकेच्या वतीने पूर्व विभागीय कार्यालय म्हणजेच मेनरोड येथील उत्सव म्हणजे शहराचा मानाचा पहिला गणपती मानला जातो, तर राजीव गांधी मुख्यालयातही सार्वजनिक गणपती अधिकारी कर्मचारी बसवत असतात. तथापि, तुकाराम मुंढे यांनी मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर मुख्यालयातील विविध प्रकारच्या मूर्ती आणि प्रतिमा हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले तसेच भालेकर मैदान येथे गणेशोत्सवाला परवानगी नाकारल्याने गणेशोत्सवावर विघ्न आल्याची चर्चा सुरू झाली होती. महापालिकेच्या कर्मचाºयांनादेखील गणेशोत्सव साजरा करता येईल किंवा नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र कार्यालयीन वेळेत आणि नागरी कामकाजाला अडथळा येत नसेल तर उत्सव साजरा करण्यास हकरत नाही अशी भूमिका आयुक्तांनी घेतली होती. त्यानुसार कर्मचारी संघटनेने मंडपासाठी परवानगी मागितल्यानंतर त्यांनी परवानगीदेखील घेतली होती. आयुुक्तांनी परवानगी तर दिलीच, परंतु उत्सवात ते सक्रिय सहभागी झाले होते. पूर्व विभागीय कार्यालय व राजीव गांधी भवन येथे तुकाराम मुंढे यांच्या शुभहस्ते सहपरिवार आरती करून श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली.
लोकसेवा हीच श्रींची सेवा
विघ्नहर्त्या श्री गणेशाचा उत्सव साजरा करीत असताना लोकसेवा हीच ईश्वर सेवा आहे. लोकसेवेच्या वेळेत आरती न करता कार्यालयीन कामच करावे, कामकाज सुरू असताना अन्य कामांसाठी वेळ दिलेला खपवून घेतला जाणार नाही, असे यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगतानाच लोकसेवेचा संकल्प करण्याचे आवाहन केले.