अखेर भाजप-मनसे साथ साथ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:20 AM2021-02-26T04:20:59+5:302021-02-26T04:20:59+5:30
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपच्या गोटात अखेर मनसेने अपेक्षित धाव घेतली असून, सहलीवर गेलेल्यांमध्ये आता सलीम शेखदेखील ...
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपच्या गोटात अखेर मनसेने अपेक्षित धाव घेतली असून, सहलीवर गेलेल्यांमध्ये आता सलीम शेखदेखील आहेत. त्यामुळे तूर्तास तरी भाजपचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या वतीने उमेदवारीचा फैसला शुक्रवारी (दि. २६) होणार आहे. नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची निवडप्रक्रिया बुधवारी (दि.२४) पार पडली. सध्याच्या समितीची मुदत २८ फेब्रुवारीस संपणार असली तरी यंदा सत्तारूढ आणि विरोधकांचे समसमान पारडे असल्याने सभापतिपदासाठी चुरशीचा सामना रंगणार आहे. त्यामुळे अद्याप निवडणूक घेण्याचा प्रस्ताव गेला नाही मात्र भाजपने तटबंदी करण्यासाठी आपले नवनिर्वाचित सदस्य सहकुटुंब अहमदाबाद सहलीवर रवाना केले आहेत.
स्थायी समितीत आठ आठ असे सदस्य संख्याबळ असले तरी मनसेचा महापौरपदाच्या निवडणुकीपासूनच भाजपकडे कल आहे. त्यामुळे अपेक्षेनुसार या पक्षाचे नूतन सदस्य सलीम शेख हेदेखील अहमदाबादला रवाना झाले आणि तेथून ते अजमेर शरीफ येथे रवाना झाले असल्याचे वृत्त आहे.
या निवडणुकीत भाजपकडून गणेश गिते यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर दुसरीकडे मात्र शिवसेनेचा उमेदवार अद्याप घोषित नाही. त्यासंदर्भात शुक्रवारी (दि. २६) शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.