अखेर मुंबई नाका परिसरात झाडू फिरला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:15 AM2021-02-24T04:15:35+5:302021-02-24T04:15:35+5:30
गोविंदनगर : शहरात सध्या केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणांतर्गत स्वच्छता मोहिमा सुरू असताना मुंबई नाका ते चांडक सर्कल ...
गोविंदनगर : शहरात सध्या केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणांतर्गत स्वच्छता मोहिमा सुरू असताना मुंबई नाका ते चांडक सर्कल परिसरात अत्यंत अस्वच्छता असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर गेल्या शनिवारी महापालिकेने या भागात स्वच्छता मोहीम राबवली, शिवाय सफाई कामगारदेखील नियमित फिरकू लागले आहेत.
मुंबई नाका परिसर हा महामार्ग बसस्थानकाचे प्रवेशद्वार असून, त्यामुळेच बाहेर गावाहून शेकडो नागरिक बसने या ठिकाणी येत असतात, परंतु या ठिकाणी अतिक्रमण आणि अस्वच्छतेचे दर्शन घडते. मुंबई नाक्यावरून चांंडक सर्कलपर्यंत रस्ता चांगल असून, दुभाजकदेखील आहेत. मात्र तेही अस्वच्छ असतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्त्याच्या कडेलादेखील कचरा आणि प्लॅस्टिक फेकलेले असते. ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी दखल घेत या संपूर्ण भागातच महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवली. या मार्गावर सुमारे २ टन कचरा संकलित करण्यात आला. त्यानंतर हा परिसर स्वच्छ झाला. मात्र, त्यासाठी आयुक्त कैलास जाधव आणि अन्य खातेप्रमुख रस्त्यावर उतरले. आता रस्त्यावर सफाई कामगार दिसू लागले असले तरी केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणापुरतेच मर्यादित न राहता या मार्गावर कायम स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होऊ लागली आहे.