...अखेर आली लग्नघटिका समीप; साधेपणाने आटोपला विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 06:08 PM2020-05-08T18:08:35+5:302020-05-08T18:09:18+5:30

दोन्ही कुटुंबियांनी या दोघांचा विवाह डिसेंबर महिन्यात जुळविला. २७ एप्रिलला मुहूर्तावर हा विवाह करण्याचा ठरविले मात्र...

... finally came the wedding clock; Simply married | ...अखेर आली लग्नघटिका समीप; साधेपणाने आटोपला विवाह

...अखेर आली लग्नघटिका समीप; साधेपणाने आटोपला विवाह

Next
ठळक मुद्देमोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा

नाशिक : शहारातील अग्रवाल दोन कुटुंबातील मुलामुलींचा विवाह अखेर शुक्रवारी (दि.८) लॉकडाउनच्या सर्व नियमांचे पालन करत मोजक्याच व-हाडीमंडळीच्या उपस्थितीत मात्र तितक्याच थाटामाटात पार पडला. नवरदेव बादल व नववधू जागृती यांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकून व अग्नीला साक्ष ठेवून पुढील सात जन्माची गाठ बांधली.

आडगाव येथील ओमप्रकाश अग्रवाल यांचे सुपुत्र बादल (२६) हा सिव्हील इंजिनियर असून पंचवटी कारंजा परिसरातील सागर अग्रवाल यांची कन्या जागृती (२५) ही ब्यूटिशियन आहे. दोन्ही कुटुंबियांनी या दोघांचा विवाह डिसेंबर महिन्यात जुळविला. २७ एप्रिलला मुहूर्तावर हा विवाह करण्याचा ठरविले गेले; मात्र अचानकपणे कोरोना आजाराने थैमान घातल्याने लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने अखेर विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर जिल्हा प्रशासनाकडून मागील दोन दिवसांपासून काही दूकाने उघडण्याची निश्चित वेळेत मुभा दिली गेल्यामुळे या दोन्ही कुटुंबियांनी आवश्यक त्या वस्तूंची खरेदी करत मुलामुलीकडच्या मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी विवाहसोहळा पंचवटी कारंजा येथे जागृतीच्या निवासस्थानी पार पडला.
या विवाह सोहळ्यात बादल व जागृतीच्या मित्र-मैत्रिणींसह नातेवाईकांनीदेखील व्हिडिओ कॉलद्वारे आपली उपस्थिती दर्शविली. व्हिडिओ कॉलवरून या नवदाम्पत्यांना पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नववधू-वरांसह उपस्थितांनी एकमेकांमध्ये ‘डिस्टन्स’ ठेवत तोंडावर मास्क लावून सहभाग नोंदविला. अत्यंत साधेपणाने विवाहसोहळा आटोपला व कुठल्याहीप्रकारचा अनावश्यक खर्च विवाहसोहळ्यावर झाला नाही. कोरोनाचा आजार नियंत्रणात आल्यानंतर नातेवाईक व मित्रपरिवाराला लग्नाची ‘पार्टी’ देणार असल्याचे बादलने सांगितले. मे महिन्यात ज्यांच्या लग्नतिथी आहे, त्यांनी कुठल्याहीप्रकारे काळजी करू नये, आपला विवाह ठरलेल्या मुहूर्तावर मात्र अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सर्व नियमांचे पालन करत आटोपशीर घेतल्यास कुठल्याहीप्रकारची अडचण भासण्याचे कारण नाही, असे मत नवरदेव बादलने व्यक्त केले.

Web Title: ... finally came the wedding clock; Simply married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.