अखेर दोन्ही उड्डाणपुलांना महासभेची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:14 AM2021-01-22T04:14:28+5:302021-01-22T04:14:28+5:30
मायको सर्कल आणि त्रिमूर्ती चौकातील या उड्डाणपुलांसाठी महापालिकेने महिनाभरापूर्वीच निविदा मागवल्या असून, त्या सादर करण्याची अंतिम मुदत २८ जानेवारी ...
मायको सर्कल आणि त्रिमूर्ती चौकातील या उड्डाणपुलांसाठी महापालिकेने महिनाभरापूर्वीच निविदा मागवल्या असून, त्या सादर करण्याची अंतिम मुदत २८ जानेवारी आहे. २४५ कोटी रुपयांच्या या कामासाठी निविदा सादर करून नंतर त्या उघडल्यावर कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याने भाजपाने ही खेळी केली आहे. २४५ कोटी रुपयांची ही पुलांची रक्कम ३१ प्रभागांतील १२७ नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांसाठी वापरावी, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे. आयुक्तांकडे रात्री हा ठराव पाठविण्यात आला आहे.
महापालिकेच्या १५ सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत ठराव क्रमांक २९८ अन्वये सर्वच प्रभागांत सुमारे पाच कोटी रुपयांची कामे धरण्यात आली आहेत. त्यासाठी कर्ज काढण्याचा प्रस्ताव भाजपाने दिला होता. मात्र १,८०० कोटी रुपये देणे असल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी ठराव थेट नाकारला. त्यातच शिवसेना आणि काँग्रेसने कर्ज काढण्यास विरोध केला. त्यामुळे मंगळवारी (दि.१९) महासभा झाल्यांनतर महापौर सतीश कुलकर्णी, सभागृहनेते सतीश साेनवणे, गटनेता जगदीश पाटील व स्थायी समिती गणेश गीते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन उड्डाणपुलांची कामे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करावीत आणि या पुलांची रक्कम महासभेतील ठरावानुसार ३१ प्रभागांसाठी वापरावी, अशी मागणी करण्यात आली होती; परंतु आयुक्तांनी पुलांना स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर आता थेट भाजपानेच महासभेद्वारे त्याला स्थगिती दिली आहे.
आयुक्त कैलास जाधव शिवसेना सरकारच्या दबावाखाली काम करून सत्तारूढ भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सभागृहनेते सतीश कुलकर्णी यांनी केला आहे. आयुक्त कैलास जाधव यांनी कर्ज काढण्यास नकार देण्यामागे राज्य सरकारचा दबाव आहे, असा आरोप सभागृहनेता सतीश सोनवणे यांनी केला आहे.
इन्फो...
भूमिपूजन फडणवीसांच्या हस्तेच करणार
कर्ज उभारणीस विरोध, घरपट्टीचे खासगीकरण करून शहरातील तरुणांना कर्ज देण्यास विरोध, महासभा चालविण्यास नियोजनबद्ध गोंधळ घालून विरोध, अशा अनेक कामांमुळे भाजपास कामे करू न देता मलिन करण्याचा घाट शिवसेनेने घातला आहे. त्यामुळे ओठात एक आणि पोटात एक, अशी भूमिका शिवसेनेचीच असल्याचा आरोपही सतीश साेनवणे व जगदीश पाटील यांनी केला आहे. उड्डाणपुलांना जरी तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली असली तरी या पुलांचे भूमिपुजन पुन्हा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते करण्यात येईल, असे जाहीर करून शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना त्यांनी आव्हान दिले आहे.