अखेर मनपाला बस परवान्याला शासनाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:23 AM2021-02-23T04:23:11+5:302021-02-23T04:23:11+5:30
तीन वर्षांपासून महापालिकेच्या बससेवेची तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी बहुतांश तयारी पूर्ण झाली असली तरी कोरोनाचे संकट उद्भवले आणि ...
तीन वर्षांपासून महापालिकेच्या बससेवेची तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी बहुतांश तयारी पूर्ण झाली असली तरी कोरोनाचे संकट उद्भवले आणि सर्वच ठप्प झाले. दळणवळणाची साधने बंद झाल्याने महापालिकेनेदेखील मग कामाची गती कमी केली. यादरम्यान बस डेपो आणि अन्य पायाभूत सुविधांची कामे सुरू असली तरी बससेवा सुरू करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त निवडण्यात आला होता. सर्व तयारी सुरू असताना बस ऑपरेशनसाठी लागणारा परवानाच नाशिक महानगर परिवहन महामंडळाला मिळाला नव्हता. त्यामुळे मुहूर्त टळला होता. अनेक प्रकारच्या पाठपुराव्यानंतर आणि शिवसेनेचे सरकार नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने अडवणूक करीत असल्याची टीका होऊ लागल्यानंतर परवान्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुक्त कैलास जाधव यांनी स्वत: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी परिवहन मंत्रालयाकडून लवकरच परवाना मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. आता गेल्या १८ तारखेला परिवहन मंत्रालयाने यास मंजुरी दिली असून त्यामुळे शहर बस वाहतुकीचा मार्ग मेाकळा झाला आहे.
इन्फो...
बस परवाना मिळाल्यानंतर आता महापालिका प्रवासीभाडे ठरविण्यासाठी आरटीएकडे अर्ज करणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतरच रस्त्यावर बस येतील आणि प्रवासीभाडे आकारता येईल.
इन्फेा..
महामंडळ निर्णय घेणार
बससेवा सुरू करणाऱ्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली असली तरी आता शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढृ लागल्याने नागरिक कितपत प्रवास करतील, याविषयी मनपा साशंक आहे. त्यामुळे बससेवा आताच सुरू करायची की सावकाश याबाबत नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.