अखेर पालकमंत्र्यांना उपरती
By admin | Published: June 30, 2015 12:37 AM2015-06-30T00:37:46+5:302015-06-30T00:38:38+5:30
अखेर पालकमंत्र्यांना उपरती
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश धाब्यावर बसवित सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नियुक्ती केलेल्या स्वीय सहायकांची नियुक्ती रद्दबातल ठरविण्यात आली असून, त्यांना पुन्हा कळवण तालुक्यात हरणबारी उपविभागात नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबत दै. लोकमतने शनिवारी (दि.२७) ‘मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर, नाशिकचे पालकमंत्री गोत्यात’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करीत यावर लक्ष वेधले होते.आघाडी सरकारच्या काळात सलग काही वर्षे राज्यमंत्र्यांकडे आणि नंतर एका महामंडळाच्या उपाध्यक्षांकडे स्वीय सहायक असलेल्या एका कर्मचाऱ्याची सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या संपर्क कार्यालयात स्वीय सहायक म्हणून नेमणूक करण्याच्या निर्णयाने जलसंपदामंत्री गिरीश महाजन अडचणीत येण्याची चिन्हे. नाशिकच्याच उर्ध्व गोदावरी प्रकल्प कार्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या निम्नस्तरावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या स्वीय सहायक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे समजते. वस्तुत: महाराष्ट्र शासनाच्या १४ नोव्हेंबर २०१४च्या शासन निर्णयानुसार मुख्यंमत्री सचिवालय, मंत्री, राज्यमंत्री कार्यालयाच्या आस्थापनेसाठी सचिवपदे निर्माण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना काढण्यात आलेल्या आहेत. या निर्णयातील ६ क्रमांकाच्या पानावर मंत्र्यांच्या स्वीय सहायकांची नियुक्ती करताना निम्नश्रेणी पदवीधारक स्वीय सहायक पदावरील नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाहीत, असे स्पष्ट म्हटलेले असताना स्थापत्य अभियांत्रिकी सहायक असलेल्या या कर्मचाऱ्यास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या संपर्क कार्यालयात स्वीय सहायक म्हणून नेमण्याबाबत जलसंपदा विभागाला पत्र दिले होते. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आल्यावर त्यांनी याबाबत पालकमंत्र्यांना विचारणा केल्याचे समजते. त्यामुळेच की काय काल (दि.२९) तातडीने उर्ध्व गोेदावरी प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाला कुंभमेळा व अनुषंगिक कामांकरिता जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वर्ग करण्यात आलेली त्यांची नियुक्ती २९ जूनच्या आदेशान्वये रद्द करण्यात आल्याचे पत्र पाठविले आहे. हे आदेश प्राप्त होताच त्वरित मूळ जागी हरणबारी कालवा उपविभागात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)