...अखेर वाडगावात बिबट्या आला पिंजऱ्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 01:28 AM2021-10-18T01:28:14+5:302021-10-18T01:28:33+5:30
गिरणारे गावाजवळील वाडगाव शिवारात मागील महिन्यात रात्री बिबट्याने एका चिमुकलीवर हल्ला करत ठार मारले होते. या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत पसरली होती. पूर्व-पश्चिम वनविभागाने वाडगाव पंचक्रोशीच्या परिसरात पिंजऱ्यांची तटबंदी करत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले होते. पश्चिम वनविभागाने गिरजाईबारीत लावलेल्या पिंजऱ्यात अखेर रात्री प्रौढ बिबट्या (मादी) जेरबंद झाल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
नाशिक : गिरणारे गावाजवळील वाडगाव शिवारात मागील महिन्यात रात्री बिबट्याने एका चिमुकलीवर हल्ला करत ठार मारले होते. या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत पसरली होती. पूर्व-पश्चिम वनविभागाने वाडगाव पंचक्रोशीच्या परिसरात पिंजऱ्यांची तटबंदी करत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले होते. पश्चिम वनविभागाने गिरजाईबारीत लावलेल्या पिंजऱ्यात अखेर रात्री प्रौढ बिबट्या (मादी) जेरबंद झाल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. वाडगावापासून तर जुने धागूर शिवारापर्यंतच्या दहा ते बारा किलोमीटरच्या परिघात आळंदी धरणाच्या आजूबाजूच्या गावे, वस्त्यांवर बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या भागात किमान सहा ते सात बिबट्यांचा वावर असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात होते.
नाशिक वनपरिक्षेत्रात ३०सप्टेंबर रोजी रात्री वाडगावात एका वस्तीवर बिबट्याच्या हल्ला करत शिवन्या निंबेकर या पाचवर्षीय बालिकेचा बळी गेला होता. या घटनेला दोन दिवस होत नाही, तोच पुन्हा येथून सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या दिंडोरी वनपरिक्षेत्रातील जुने धागुर येथे ३ऑक्टोबर रोजी बिबट्याने पुन्हा केलेल्या हल्ल्यात चार वर्षीय ऋुत्विका विठ्ठल वड या बालिकेचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. तिचा मृतदेह सोमवारी (दि.४) सकाळी वनखात्याच्या गस्ती पथकाला आढळला होता. घटनेनंतर या भागात पिंजऱ्यांची तटबंदी पूर्व-पश्चिम वनविभागाकडून वाढविण्यात आली. तसेच युध्दपातळीवर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली. ट्रॅप कॅमेरे ठिकठिकाणी लावून बिबट्यांच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करण्यात यश येत नव्हते. चार दिवसांपूर्वी दरी व वाडगावात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले करत ठार मारल्याने बिबट्याच्या हालचाली पश्चिम विभागाच्या हद्दीत दुगावपासून पुढे गिरणारेपर्यंत वाढल्याचे दिसून येत होते. गिरजाईबारीत लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्याच्या शोधात पुर्ण वाढ झालेली बिबट्याची मादी अडकल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली.
--इन्फो--
आठ पिंजरे; दहा ट्रॅप कॅमेरे तैनात
लागोपाठ झालेल्या बिबट्याच्या मानवी हल्ल्याच्या घटनानंतर वनविभागाने खडबडून जागे होत युध्दपातळीवर मोहीम हाती घेतली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आळंदी धरण परिसरातील २५ किलोमीटरच्या परिघात एकूण पाच पथके दिवसरात्र गस्तीवर होते. वाडगाव शिवारात एकूण चार पिंजरे आणि पाच कॅमेरे, तर जुने धागूर शिवारात चार पिंजरे व पाच ट्रॅप कॅमेरे तैनात करण्यात आले होते. रात्रीच्यावेळीसुध्दा या भागात नागरिकांना सावधगिरीचा इशारा गस्ती पथकाच्या वाहनाद्वारे दिला जात आहे.