अखेर ‘नासाका’ ई-निविदा प्रक्रियेला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:19+5:302021-08-25T04:20:19+5:30
नाशिक सहकारी साखर कारखाना गेल्या आठ ते दहा वर्षांपासून बंद पडला आहे. सुमारे बाराशे पन्नास मेट्रिक टन गाळप क्षमता ...
नाशिक सहकारी साखर कारखाना गेल्या आठ ते दहा वर्षांपासून बंद पडला आहे. सुमारे बाराशे पन्नास मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या साखर कारखान्याचे नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात अंदाजे १७ हजार सभासद आहेत. कारखाना सुरू असताना जिल्हा बँकेकडून कारखान्याने काेट्यवधी रुपये कर्ज घेतले हाेते. कालांतराने काही कारणास्तव कारखाना बंद झाला त्यातून कर्जाचा डाेंगर वाढला. कर्ज वसुली करण्यासाठी बँकेने कारखान्यावर जप्ती आणली आहे. हा कारखाना सुरू करण्यात यावा यासाठी बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे व आमदार सरोज हिरे यांनी प्रयत्न केले. यासाठी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह सहकार विभाग अपर मुख्य सचिव, साखर आयुक्त, प्रादेशिक साखर सहसंचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक जिल्हा सहकारी बँके प्रशासक, नासाका कर्मचारी संघटनेचे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात बैठक झाली होती.
बैठकीचे इतिवृत्त तयार करून नाशिक जिल्हा बँकेने लवकर ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचे सहकारमंत्र्यांनी आदेशित केले होते. त्यानुसार नाशिक जिल्हा सहकारी बँकेने निविदाप्रक्रिया राबविली असून, निविदा सोमवारी वृत्तपत्रांमध्ये सोमवारी (दि.२३) प्रसिद्ध झाली आहे. यामुळे शेतकरी व कारखाना कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
चौकट===
बाजार समितीच्या भूमिकेकडे लक्ष
नाशिक साखर कारखाना सहकारी तत्त्वावर चालविण्याची तयारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने दर्शविली होती. सभासदांच्या सर्वसाधारण सभेतही तसा ठराव करण्यात आला असला तरी, बाजार समितीच्या विरोधात काही व्यक्तींनी पणन विभागाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निविदा प्रक्रियेत बाजार समिती सहभागी होते की नाही याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.