..अखेर पडक्या वाड्यांच्या पुनर्वसनासाठी हालचाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:56 AM2019-08-04T01:56:18+5:302019-08-04T01:56:50+5:30
शहरातील वाडे एकेक करीत धारातीर्थी पडत असून, महापालिकेची रखडलेली क्लस्टर म्हणजेच गावठाण पुनर्विकासाची योजना कधी लागू होणार याविषयी प्रश्न केले जात आहे. अखेरीस महापालिकेने आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्यासाठी शनिवारी (दि.३) निविदा मागवल्या असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर क्लस्टर योजना लागू होणार आहे.
नाशिक : शहरातील वाडे एकेक करीत धारातीर्थी पडत असून, महापालिकेची रखडलेली क्लस्टर म्हणजेच गावठाण पुनर्विकासाची योजना कधी लागू होणार याविषयी प्रश्न केले जात आहे. अखेरीस महापालिकेने आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्यासाठी शनिवारी (दि.३) निविदा मागवल्या असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर क्लस्टर योजना लागू होणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरदेखील मंजुरीला किती वेळ लागेल असे सांगता येत नसले तरी वर्षाखेरीस ही योजना मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.
२३ गावठाण क्षेत्र करून एकत्र करण्यात आलेले ही महापालिका आहे. गावठाण किंवा गाभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जुनी घरे किंवा वाडे आहेत. मात्र, अनेक पिढ्यांचा हा वारसा आता कमी होऊ लागला आहे. शंभर ते दीडशे-दोनशे वर्षांचे अनेक वाडे आता तग धरू शकत नाही. जे वाडे तग धरत नाही ते पडण्यास आले आहेत. अनेक मालकांनी वाडे सोडले आहेत, परंतु वाड्यातील अल्प भाडे अन्यत्र असलेले दर यामुळे भाडेकरू सोडण्यास तयार नाही त्यामुळे अनेक वर्षांपासून गावठाण पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. यंदा सरकारने क्लस्टर योजना राबवण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यानुसार एक हजार चौरस मीटर क्षेत्रातील वाडे एकत्र करून वाड्यांची इमारत करण्यात येणार असून, चार एफएसआय देण्यात येणार आहे. सदरचा प्रस्ताव अमलात आणण्यापूर्वी गावठाणात एकाच ठिकाणी इतकी घनता वाढल्यानंतर त्याचा मनपाच्या मूलभूत सुविधांवर काय परिणाम होऊ शकेल यासाठी आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्याचे आदेश शासनाने महापालिकेला दिले होते. वर्षभर त्यात कालहरण झाल्यानंतर महापालिकेने अखेरीस शनिवारी (दि.३) निविदा मागवल्या आहेत.