...अखेर महापालिका आयुक्तपदी गमे यांच्या नावावर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 07:32 PM2018-12-04T19:32:44+5:302018-12-04T19:34:39+5:30
अखेर शासनाने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण व्ही. गमे यांची आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि.४) दिले. गमे यांचा जिल्हाधिकारी पदाचा पदभार दिपा मुधोळ-मुंडे यांना सोपविण्यात आला आहे.
नाशिक : मागील महिन्यात २१ तारखेला तुकाराम मुंढे यांची बदली राज्याच्या नियोजन विभागात सहसचिवपदी करण्यात आली. मागील तेरा दिवसांपासून महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार प्रभारी म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., यांच्याकडे सोपविण्यात आला होता. नवे आयुक्त कोण? याविषयी विविध नावे समोर येत चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर शासनाने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण व्ही. गमे यांची आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि.४) दिले. गमे यांचा जिल्हाधिकारी पदाचा पदभार दिपा मुधोळ-मुंडे यांना सोपविण्यात आला आहे.
गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांच्या बदलीसाठीचे प्रयत्न आणि अन्य चर्चा होत सुरू होत्या. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंढे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने आमदारांसह महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न करूनही उपयोग होत नव्हता. दरम्यान, आता फडणवीस यांनीच वरदहस्त काढून घेतल्याने मुंढे यांची बदली झाली. महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार ८ फेबु्रवारी रोजी मुंढे यांनी स्विकारला होता. कायद्यावर बोट ठेवून त्यांचा काम करण्याचा फटका लोकप्रतिनिधींना बसला आणि त्यातून त्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीला सुरुवात झाली. महापालिकेने संमत केलेली अडीचशे कोटी रुपयांची कामे रद्द करण्यावरून पहिली ठिणगी पडली आणि त्यानंतर नगरसेवक निधी रद्द करणे, अगोदरच्या आयुक्तांनी मंजूर केलेली कामे रद्द करणे, करवाढ करणे यांसारख्या वादांची भर पडत गेली.
५४वर्षीय नुतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिकमध्ये यापूर्वी निवासी जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी म्हणून कामकाज केले आहे. तसेच नंदूरबार जिल्हा परिषदेचे ते मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील राहिले आहेत. ३मे २०१७ रोजी गमे यांना उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ते एमएसस्सी (अॅग्रीकल्चर) आहेत. मूळचे अहमदनगरचे असलेले गमे हे नाशिकचे जावईदेखील आहेत.
---
राधाकृष्णन अन् राधाकृष्ण...
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आणि महापालिका आयुक्तपदी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाल्यामुळे नाशिकचा कारभार आता ‘राधाकृष्ण’ यांच्याकडे संपुर्णत: आला आहे. महत्त्वाच्या दोन्ही पदांवर समान नामधारी व्यक्ती असल्यामुळे जिल्ह्याची आणि शहराची भविष्याची घोडदौड यशस्वीपणे होईल, असा आशावाद व्यक्त होत आहे.
--