अखेर महापालिकेला आली जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:30 AM2018-07-12T00:30:52+5:302018-07-12T00:31:09+5:30
येथील प्रभाग क्र मांक २५ मधील कामटवाडेरोड ते दुर्गानगर या परिसरातील एलईडी दिवे गेल्या सोमवारी (दि.९) मध्यरात्री अचानक बंद पडल्याने परिसरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते.
सिडको : येथील प्रभाग क्र मांक २५ मधील कामटवाडेरोड ते दुर्गानगर या परिसरातील एलईडी दिवे गेल्या सोमवारी (दि.९) मध्यरात्री अचानक बंद पडल्याने परिसरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. मनपाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच लावण्यात आलेले एलईडी हे एकाच वेळी बंद पडल्याने याबाबत प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांनी विद्युत विभागाचा ढिसाळ व नियोजनशून्य कारभार तसेच मक्तेदाराच्या गलथानपणाबाबत नाराजी व्यक्त करीत मनपा आयुक्तांना पत्र दिले होते. यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांना जाग आली व आज सकाळपासून परिसरातील सर्व एलईडी दिवे सुरू करण्यात आल्याचे चित्र बघावयास मिळाले. सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील कामटवाडेरोड, सायखेडकर हॉस्पिटल व दुर्गानगर येथे सोमवारी मध्यरात्री एलईडी दिवे काही तांत्रिक कारणामुळे अचानक बंद पडले तर काही पथदीपांचा स्फोट झाला. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. याबाबतची माहिती रात्री युवासेनेचे पदाधिकारी पवन मटाले यांनी मनपाच्या विद्युत विभागाला दिली असता कर्मचाºयांकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे मटाले यांनी सांगितले. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मनपा अॅपवरदेखील तक्रार नोंदविली. या घटनेमुळे मनपा विरोधात नागरिकांमध्ये नाराजी आहे.
बडगुजर यांनी मनपाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत काही दिवसांपूर्वीच लावण्यात आलेले एलईडी खराब कसे झाले, याबाबत मनपा आयुक्तांना पत्र देत चौकशीची मागणी केली. या पत्रामुळे मनपा अधिकारी व कर्मचारी कामाला लागले. बुधवारी सकाळपासून बंद पथदीपांचा आढावा घेत कामटवाडे शिवार, सायखेडकर हॉस्पिटल परिसर, त्रिमूर्ती चौक, दुर्गानगर या भागातील बंद झालेले एलईडीचे दिवे दुरुस्त करण्यात आले.