...अखेर वन्यजिवांचा दाह शमण्याचा मार्ग खुला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 01:22 AM2021-10-04T01:22:00+5:302021-10-04T01:22:23+5:30
जिल्ह्यात सातत्याने विविध घटनांमध्ये वन्यजीव जखमी होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना वन्यजिवांच्या वेदनांचा दाह थांबणार का? असा प्रश्न वन्यजीवप्रेमी संघटनांकडून उपस्थित करत ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ची मागणी जोर धरू लागली होती. अखेर नाशिक पश्चिम वनविभागाने यासाठी पुढाकार घेत जिल्हा नियोजन समितीपुढे प्रस्ताव सादर करत मंजुरी मिळविली. म्हसरुळ येथील वन आगारातील सुमारे दीड एकर जागेत उत्तर महाराष्ट्रातील पहिले वन्यप्राणी-पक्षी उपचार केंद्र साकारले जाणार आहे.
नाशिक : जिल्ह्यात सातत्याने विविध घटनांमध्ये वन्यजीव जखमी होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना वन्यजिवांच्या वेदनांचा दाह थांबणार का? असा प्रश्न वन्यजीवप्रेमी संघटनांकडून उपस्थित करत ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ची मागणी जोर धरू लागली होती. अखेर नाशिक पश्चिम वनविभागाने यासाठी पुढाकार घेत जिल्हा नियोजन समितीपुढे प्रस्ताव सादर करत मंजुरी मिळविली. म्हसरुळ येथील वन आगारातील सुमारे दीड एकर जागेत उत्तर महाराष्ट्रातील पहिले वन्यप्राणी-पक्षी उपचार केंद्र साकारले जाणार आहे.
पश्चिम वनविभागाकडून ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर उभारणीच्या बांधकामाच्या भूमिपूजनासाठी वन्यजीव सप्ताह मुहूर्त निवडण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सोमवारी (दि.४) सकाळी ११वाजता म्हसरुळ येथील वनविभागाच्या डेपोमध्ये हा सोहळा पार पडणार आहे.
‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ उभारण्याबाबत उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालत ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटरची काळाची गरज ओळखून नव्याने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांना दिले. त्यांनी बारकाईने अभ्यास करत योग्य प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन समितीपुढे मांडला. या प्रस्तावाला समितीने मंजुरी देत यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी डीपीडीसीतून वनविभागाकडे देण्यात आला. वनविभागाने हा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करत बांधकामाची निविदा काढण्याचे पत्र दिले. निविदा काढण्यात आली असून या केंद्रासाठी स्वतंत्ररीत्या मनुष्यबळ पुरविले जाणार आहे. त्यांच्यासाठी स्वयंपाकगृह, सुरक्षा कक्ष, निवासव्यवस्था पुरविली जाणार आहे. याठिकाणी एक रेस्क्यू युनिटदेखील राहणार आहे. पुढील वर्षाच्या वन्यजीव सप्ताहपर्यंत ही वास्तू पूर्णत्वास येईल, असे वनविभागाने म्हटले आहे.
--इन्फो--
असे असेल उपचार केंद्र
केंद्रात वन्यप्राणी शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग, एक्स-रे कक्ष, निरीक्षण कक्ष, औषधे, खाद्यपदार्थ भांडारगृह यासाठी बिबट्याकरिता आठ अद्ययावत असे ऐसपैस प्राणी संग्रहालयाप्रमाणे मोठे आठ पिंजरे, वाघासाठी दोन पिंजरे, तरस, कोल्हे, लांडग्यांसाठी पाच पिंजरे, तसेच या सर्व वन्यप्राण्यांना सुरक्षितरीत्या वावरता यावे यासाठी संवर्धन परिसरासह काळवीट, हरीण, माकड, वानरांसाठी प्रत्येकी दोन पिंजरे उभारले जाणार आहे.
--इन्फो--
पक्ष्यांच्या जखमांवरही फुंकर
जखमी वन्यप्राण्यांसह पक्ष्यांच्याही वेदनांवर या केंद्रात उपचाराची फुंकर घातली जाणार आहे. मोरासाठी एक स्वतंत्र पिंजरा, तर गिधाडासारख्या अन्य पक्ष्यांसाठी सात स्वतंत्र युनिट बांधण्यात येणार आहे. यामध्ये पक्ष्यांसाठी उड्डाण चाचणी युनिट असणार आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांसाठीसुद्धा प्रत्येकी एक युनिट असणार आहे.