अखेर सप्तशृंगी देवी ट्रस्टकडून गरजुंना अन्नदान सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:10 AM2021-05-03T04:10:18+5:302021-05-03T04:10:18+5:30
सप्तशृंगगड : श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरील देवी मंदिर व राज्यातील सर्व धार्मिक स्थळे कोरोनाच्या महामारीमुळे बंद ठेवण्याचा निर्णय ...
सप्तशृंगगड : श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरील देवी मंदिर व राज्यातील सर्व धार्मिक स्थळे कोरोनाच्या महामारीमुळे बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे येथील ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हतबल झालेल्या ग्रामपंचायतीने अखेर गडावरील ट्रस्टपुढे पदर पसरला असून, येथील ग्रामस्थांसाठी दोनवेळच्या मोफत भोजनाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने नियोजन करून गरजू व्यक्तींसाठी मोफत व अन्य व्यक्तींसाठी दहा रूपये या अल्पदरात प्रसादालयात अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायतीच्या पत्रानंतर आठ दिवस उलटूनही व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे व भगवान नेरकर यांनी त्यावर कुठलाही निर्णय घेतला नव्हता. या पत्राबाबत त्वरित निर्णय घेणे सामाजिक दृष्टिकोनातून आवश्यक होते. याबाबत सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त दीपक पाटोदकर यांनी ग्रामस्थांना दोनवेळचे जेवण पुरविणे ही सामाजिक बांधिलकी ओळखून ग्रामस्थांसाठी जेवणाची मोफत व्यवस्था करावी, असे ट्रस्टला खरमरीत पत्र पाठवले. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत पाटोदकर यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. तसेच याबाबत ट्रस्टकडून अन्नदानाबाबत निर्णय यापूर्वीच झाला असून, गरजूंना मोफत व अन्य नागरिकांना अल्पदरात दहा रूपये शुल्क घेत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. भोजनालयातील मुख्य आचारी व सुपरवायझर कोरोनाबाधित निघाल्याने काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे अन्न क्षेत्र हाॅलचे सॅनिटायझेशन करून २ मेपासून मोफत अन्नदानाची व्यवस्था करण्यात आल्याचे ट्रस्टमार्फत कळविण्यात आले आहे. तसेच भविष्यात कोरोनाबाधित रूग्णांना ट्रस्टमार्फत आवश्यक ती सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने दिले आहे.
चौकट
सप्तशृंगगडाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कोणताही रोजगार व व्यवसाय सप्तशृंगगडावर सुरू नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे आर्थिक बाबीचा विचार करता, गतवर्षीप्रमाणे गरजू ग्रामस्थांना मोफत जेवण देण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे वेळोवेळी ट्रस्टकडे केली. परंतु, ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच ट्रस्टला खडबडून जाग आली व ट्रस्टने निर्णय घेऊन मोफत भोजन व्यवस्था सुरू केली. त्याबाबत ‘लोकमत’चे व ट्रस्टचे मन:पूर्वक आभार.
- रमेश पवार
सरपंच, सप्तशृंगगड
इन्फो...
सप्तशृंग गडावरील व्यावसायिकांची व हातावर पोट असलेल्या लोकांची अत्यंत दयनीय परिस्थिती झाली असून, संपूर्ण एप्रिल महिना व पुन्हा पंधरा मेपर्यंत लाॅकडाऊन वाढविल्याने येथील व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. सप्तशृंगी ट्रस्टने कोरोना प्रतिबंधामुळे निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून गरजू ग्रामस्थांना दोनवेळचे जेवण पुरविण्याचा निर्णय त्वरित घेणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने त्वरित ट्रस्टला पत्राद्वारे कळविले व ट्रस्टने निर्णय घेऊन गरजू ग्रामस्थांना मोफत भोजनाची व्यवस्था केली.
- ॲड. दीपक पाटोदकर
विश्वस्त, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट