...अखेर ‘त्या’ शहीद चौकाला मिळाला नामफलक; उपेक्षा थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:06 PM2018-08-27T13:06:16+5:302018-08-27T13:09:22+5:30
महापालिकेला मुहूर्त मिळत नव्हता; अखेर यावर्षी पालिकेला मुहूर्त लाभला आणि या चौकात ‘शहीद अब्दुल हमीद’ यांचे नामफलक उभारले. त्यामुळे महापालिकेला सहा वर्षानंतर का होईना शहिदाचे स्मरण झाले अशी चर्चा सुरू होती.
नाशिक : जुने नाशिक परिसरातील प्रभाग क्रमांक-१४मधील शहीद अब्दुल हमीद चौकाला मागील सहा वर्षांपासून नामफलकाची प्रतीक्षा होती. महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणीही केली जात होती; मात्र पालिकेला मुहूर्त मिळत नव्हता; अखेर यावर्षी पालिकेला मुहूर्त लाभला आणि या चौकात ‘शहीद अब्दुल हमीद’ यांचे नामफलक उभारले. त्यामुळे महापालिकेला सहा वर्षानंतर का होईना शहिदाचे स्मरण झाले अशी चर्चा सुरू होती.
जुन्या नाशकातील भद्रकाली, पिंजारघाट, खडकाळी या भागाला जोडणाऱ्या रस्ते ज्या चौकात एकत्र येतात तो चौक शहीद अब्दुल हमीद यांच्या नावाने ओळखला जातो. १९६५च्या भारत-पाक युध्दात वीरमरण आलेले अब्दुल हमीद यांना भारत सरकारने मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित केले आहे.
अब्दुल हमीद यांनी पळकुट्या पाकिस्तान सैन्याचा पाठलाग करुन केवळ ‘गन माउंटेड जीप’च्या सहाय्याने पाकिस्तान सैन्याचे ‘अमेरिकन पॅटर्न टॅँक’ उध्दवस्त केले होते. यावेळी बॉम्बगोळा त्यांच्या जीपवर आदळल्याने अब्दुल हमीद जखमी झाले होते. १० सप्टेंबर १९६५साली त्यांना वीरमरण आले.
दरम्यान, जुन्या नाशकातील या चौकात सहा वर्षांपुर्वी शहीद अब्दुल हमीद यांचा नामफलक होता; मात्र त्यावेळी चौकामध्ये करण्यात आलेल्या विकासकामांतगर्त फलक हटवावा लागला; त्यानंतर पुन्हा फलक उभारण्यासाठी महापालिके ला तब्बल सहा वर्षांचा कालावधी लागला हे विशेष. यासाठी प्रभागाच्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावाही केला; मात्र त्यांनाही यश मिळू शकले नाही. अखेर सहा वर्षांनंतर महापालिकेला आणि लोकप्रतिनिधींना शहीद अब्दुल हमीद यांचे महत्त्व कळले आणि प्रभागाच्या नगरसेवकांनी स्वत: पुढाकार घेत मराठी व उर्दू अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांचे ‘शहीद अब्दुल हमीद चौक’ असे नामफलक महापालिकेच्या बोधचिन्हासह उभारल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
‘लोकमत’च्या पाठपुराव्याने उपेक्षा थांबली
शहीद अब्दुल हमीद यांच्या नावाने ओळखल्या जाणारा चौक नामफलकविना असून शहीद चौकाची उपेक्षा होत आहे, याकडे ‘लोकमत’ने मागील वर्षी स्वातंत्र्यदिनाच्यापार्श्वभूमीवर १३ आॅगस्ट रोजी सचित्र वृत्त प्रसिध्द केले होते. तसेच २०१६साली १०सप्टेंबर रोजी अब्दुल हमीद यांच्या स्मृतिदिन विशेष वृत्त प्रसिध्द करुन महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सातत्याने लोकमतने याबाबत पाठपुरावा सुरू ठेवल्याने लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष घातले आणि नामफलक उभारल्याने शहीद चौकाची उपेक्षा थांबण्यास मदत झाली.